सैनिक व पोलिस बांधवांचा सन्मान अभिमानास्पद : केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पिंपरी(प्रतिनिधी)–देशाच्या सिमेवर अहोरात्र उभे असलेले सैनिक आणि देशाच्या अंतर्गत संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे पोलिस यामुळेच आपण सुखाची झोप घेत आहोत. त्यामुळे पोलिस बांधवांचा केलेला सन्मान अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री कृष्णचंद्र सिसोदिया यांनी केले. 

‘पोलिस फेंड्स वेलफेअर असोसिएशन महराष्ट्र राज्य’च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘शूरा आम्ही वंदिले’ कार्यक्रमांतर्गत पोलिस व सैन्य दलातील कर्तबगार आधिकार्याचा, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिसोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, महापौर माई ढोरे, उपमहापौर हिरा नानी घुले, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, ब्रिगेडियर सुधीर सावंत, कीर्तीचक्र सन्मानित संतोष राळे, कमांडर रघुनाथ सावंत, तहसिलदार गीता गायकवाड, समाजकल्याण विभागाचे श्री. वाघमारे, असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, रुपाली दाभाडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विनेश भोजे, उपाध्यक्ष कमलजित सिंग, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन लाड, पुणे शहराध्यक्ष जितेंद्र निजामपूरकर, ललिता चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 पुढे बोलताना सिसोदिया म्हणाले, की कोरोना काळात स्वत:च्या परिवाराची चिंता न करता पोलिस नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र रस्त्यावर उभे होते. या दरम्यानची पोलिसांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे ‘पोलिस फेंड्स वेलफेअर असोसिएशनने पोलिसांचा केलेला सन्मान उचित आहे. पोलिसांचा सन्मान व्हायलाच हवा, असेही त्यांनी सांगितले.

 पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, की पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन पोलिसांविषयी करीत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. आज सैनिक व पोलीस देशाला सुरक्षितता पुरविणारे महत्त्वाचे दोन घटक आहेत. समाजकंटकांचे निर्दालण करणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. पोलिस आणि नागरीक एकत्र येऊन आणखी चांगले काम करु शकतात. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र पुण्यापेक्षा मोठे आहे. परंतु, कर्मचारी संख्या कमी आहे. सर्वसामान्य लोकांची कायदा पालन करण्याची इच्छा असते. मुलांनी चांगले शिक्षण घेऊन चांगला नागरीक बनणे हे उद्दीष्ठ ठेवावे. खाकी वर्दी हा पोलिसांचा धर्म आणि कर्तव्य आहे.

 ब्रिगेडियर सुधीर सावंत म्हणाले, की भारतीय सैनिक ही त्यागाची परंपरा आहे. यंदा 1971 च्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या संदर्भात खूप आठवणी आहेत. त्यावेळचे अनुभव रोमंचक, अंगावर काटा आणणारे होते. हे विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने येत्या 3 ते 16 डिसेंबर दरम्यान सैनिक फेडरेशन गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना 1971 च्या युद्धाविषयी माहिती देणार आहे. तसेच या युद्धातील सैनिकांच्या अनुभवांचे एक पुस्तक देखील काढणार आहोत.

 मंचक इप्पर यांनी सांगितले, की पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे कार्य अभिमानास्पद आहे. प्रत्येक दोन तासाला पोलिसाच्या भूमिका बदलत असतात. समाजाच्या अपेक्षा असतात की पोलिसांनी सर्वच बाबतीत एक्स्पर्ट असले पाहिजे. अगदी तशीच पोलिसांची जबाबदारी आहे. सिमेवर सैनिकांची भूमिका महत्त्वाची आहे. अगदी त्याप्रमाणे पोलिसांची भूमिका आहे. बर्‍याचदा आपल्यातच गुन्हेगार लपलेले असतात; अशा गुन्हेगारांना शोधून काढण्याचे महा कठीण काम पोलिसांना करावे लागते. एकंदरीत हवामानाप्रमाणे पोलिसांना बदलावे लागते. यावेळी मंचक इप्पर यांनी पोलिसांविषयीची कविता सादर करीत सभागृह भारावून सोडले.

महापौर ढोरे म्हणाल्या, एखादी संस्था स्थापण करणे सोपे असते, पण समाजोपयोगी उपक्रम राबवित संस्था चालविणे, ही अवघड गोष्ट आहे. पोलिस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे कार्य उल्लेखनिय आहे. पोलिसांचे सुरक्षैततेचे कवच असल्यानेच आज महिला निर्धास्तपणे समाजात वावरताना दिसतात. महापालिकेतर्फे पोलिसांच्या अडचणींची नेहमी आम्ही दखल घेत असतो. 

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन चिंचवडे यांनी केले. ते म्हणाले, की जवान व पोलिस यांच्याबद्दल प्रत्येकाला आस्था, अभिमान वाटावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोरोना काळात पोलिस बांधव रस्त्यावर होते, अशा परिस्थितीत पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट होती. दवाखान्यात डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत होते, तर कोरोना होऊच नये, यासाठी पोलिस बांधव रस्यावर होते. 1971 च्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यातील देशाच्या सीमा सुरक्षित राखण्याची जबाबदारी समर्थपणे पेलणार्‍या सैनिकांचा सन्मान करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य समजतो. वर्षभर पोलिस बांधवांसाठी विविध उपक्रम राबवित असतो.

सूत्रसंचालन भिके यांनी केले, तर आभार रुपाली दाभाडे यांनी मानले.   

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *