सोमवती अमावस्येचे महत्व आणि पूजाविधी

अध्यात्म
Spread the love

आज (20 जुलै) सोमवार श्रावण महिन्याची अमावास्या तिथी. सोमवारी ही अमावास्या आल्याने तिला  सोमवती अमावस्या म्हणतात. याशिवाय ती श्रावण महिन्यात आल्याने तिला ‘हरियाली अमावस्या’ असेही म्हटले जाते. अमावस्या तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे, दान आणि पूजा-पाठ याला महत्व आहे. श्रावण महिन्यात सोमवारी अमावस्या आल्याने तिचे महत्त्व अधिक वाढते. परंतु यावर्षी कोरोना संकटामुळे पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत या दिवशी घरी स्नान करावे आणि देवाचे नामस्मरण करुन पूर्वजांना तर्पण करावे असे पुराणात सांगितले आहे.

सोमवती अमावस्येचे महत्त्व

पंचांगामध्ये अमावस्येच्या तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान केल्यास विशेष पुण्यप्राप्त होते. चंद्राच्या 16 व्या कलांना अमावस्या म्हणतात. या तिथीला ही चंद्राची कला पाण्यात प्रवेश करते. अमावस्या महिन्याची तिसवी तिथी आहे. जिला कृष्णपक्षाची समाप्ती म्हणून संबोधले जाते.    या या दिवशी चंद्र आणि सूर्य यांच्यातील फरक शून्य असतो.  

अमावास्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे महत्त्व

हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये देवी-देवतांचा वास असतो. त्यामुळे सोमवती अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवती अमावस्यामुळे शिवपूजेचे महत्त्व आणखीनच वाढते. या दिवशी सर्व पूजा साहित्याने पिंपळाची पूजा केल्यास विशेष लाभ होतो असे म्हणतात. अमावस्येला उपासना केल्याने  लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते कारण सर्व तिथीमध्ये अमावस्या लक्ष्मी मातेला जास्त प्रिय आहे असेही सांगितले गेले आहे.    

पित्रांची तिथी अमावस्या

धर्मग्रंथानुसार अमावस्या पित्रांची तिथी मानली जाते. या तारखेला सकाळी गंगा स्नान करून पूर्वजांना  तर्पण केले जाते. यामुळे पित्रांचा आत्मा प्रसन्न होतो. त्यामुळे कुटुंबात आनंद आणि समृद्धी वाढते. अमावस्येला गरिबांना दानही केले जाते.

ज्योतिषशास्त्रीय गणितांनुसार जेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच राशीत येतात तेव्हा अमावस्या असते आणि जेव्हा हे दोघेही 180 अंशांवर समोरासमोर येतात तेव्हा पौर्णिमा असते.  भगवान शंकराने कृष्णपक्षापासून अमावस्येपर्यंतचा अधिभार पित्रांना तर शुक्लपक्षाच्या प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा देव-देवतांना दिला आहे. त्यामुळे पित्रांच्या संबंधित सर्व श्राद्ध-तर्पण आदी कार्य अमावस्येपर्यंत आणि सकळ विधी किंवा मोठे यज्ञ असे इतर धार्मिक कार्य शुक्लपक्षाच्या पौर्णिमेदरम्यान केले जातात. या सर्व युतींमध्ये श्रावणातील सूर्य आणि चंद्राच्या मिलनाला श्रेष्ठ मानले गेले आहे. या दिवशी जर सोमवार असेल तर ते प्राणिमात्रांसाठी मोठे वरदान समजले जाते.

सोमवती अमावस्या पूजाविधी   

या महापुण्यदायी दिवशी आपल्या मुखातून अथवा बोलण्यातून कोणासाठीही अशुभ शब्द बोलले जाऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे.  यामागचे कारण असे आहे की यादिवशी आपले मन, कृती आणि बोलण्याद्वारेसुद्धा कुणाबाबत अशुभ विचार केला नाही पाहिजे. सोमवती अमावस्येच्या दिवशी ओठातून उपांशु क्रियेद्वारे ‘ओम नमः शिवाय’ मंत्र पठण करून शिवलिंगावर पाणी वगैरे अर्पित करावे. प्रत्येकाने  आपले प्रारब्ध सुधारण्यासाठी आणि आपले भाग्य बळकट करण्यासाठी यथाशक्ती  या दिवशी दान,पुण्य आणि जप केला पाहिजे.

कुठल्याही पवित्र नदीमध्ये अथवा समुद्रामध्ये जाणे शक्य नसेल तर   सकाळी आपल्या घरात इतर कामे बाजूला ठेऊन स्नान करा, स्नान आणि जप करताना सत्यव्रत पाळायला हवे, हे लक्षात ठेवा. खोटे बोलणे टाळा, फसवणूक करणे यापासून स्वत:ला दूर ठेवा.  एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तके, भुकेल्यांना अन्न, गायींना हिरवा चारा, कन्यादानसाठी आर्थिक मदत, सर्दीने पीडित गरीबांना कपडे आणि इतर उपयुक्त वस्तू तुमच्या क्षमतानुसार दान करा.

या दिवशी शिव परिवाराची पूजा केल्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार अन्न, वस्त्र, गोवंश,जमीन, सोने, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी दान कराव्यात. या दिवशी, शिवलिंगावरील केलेल्या पंचामृताच्या अभिषेकाने भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्या जन्मकुंडलीतील सूर्य आणि चंद्र ग्रहदशांच्या दुष्परिणामांपासून त्यांना मुक्ती मिळते, असे पुराणात सांगितले  गेले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *