कसबा- चिंचवड पोटनिवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला : कसब्यात धंगेकर तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)–कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज ( गुरुवार दि. २ मार्च) रोजी होत आहे. दरम्यान, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या दोन्ही मतदार संघाच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कसबा मतदार संघात भाजप आणि मित्र पक्षांचे उमेदवार हेमंत रासने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांनी निकालाअगोदरच आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे लावलेले बॅनर, दोन्ही बाजूने विजयाचे केले जाणारे दावे, प्रभागनिहाय झालेल्या लक्ष मतदानावरून व्यक्त केलेले जाणारे अंदाज, काही रिसर्च संस्थांनी जाहीर केलेले एक्झिट पोल, ज्योतिषांनी वर्तवलेला अंदाज यामुळे कुणाचा गुलाल उधळला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

कसबा मतदारसंघासाठी भाजपकडून हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात काँटे की टक्कर आहे. दोन्ही उमेदवारांकडून या निवडणुकीसाठी धुमधडाक्यात प्रचार करण्यात आला आहे. भापजकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासह ४० स्टार प्रचारकांची मोठी फौज पुण्यात दाखल झाली होती. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही कोपरा सभा आणि रोड शो केले आहेत. त्यामुळे कसब्यात नेमकी कोण बाजी मारणार?,हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात लढत आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचा दोन खासगी संस्थाचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. यामध्ये स्ट्रेलिमा आणि रिंगसाईड रिसर्च या दोन संस्थांनी या पोटनिवडणुकीसाठीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप या तर कसब्यात महाआघाडीचे रविंद्र धंगेकर हे बाजी मारणार असल्याचे अंदाज व्यक्त केला आहे.

कसब्यात रवींद्र धंगेकर बाजी मारणार?

स्ट्रेलेमा या संस्थेच्या सर्व्हेनुसार, कसब्यात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. येथे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या पराभवाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा १५ हजार मताधिक्यांनी विजयी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हेमंत रासने यांना ५९ हजाराच्या आसपास तर रविंद्र धंगेकर यांना ७४हजाराच्या आसपास मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या गुरुवारी (२ मार्च) निकाल लागणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातून कोण बाजी मारणार? हे निकालानंतरच समोर येणार आहे

चिंचवडमध्ये भाजप गड राखणार?

 द स्ट्रेलेमा या संस्थेच्या सर्व्हेनुसार, चिंचवडमध्ये भाजपला जागा राखण्यात यश येण्याचा अंदाज आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना १ लाख ५  हजाराच्या आसपास मते मिळण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादीचे नाना काटे यांना ९३ हजार आणि राहुल कलाटे यांना ६० हजाराच्या आसपास मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ‘रिंगसाईड रिसर्च’च्या अंदाजानुसार, चिंचवडची जागा भाजपच जिंकेल असा अंदाज आहे.

मतमोजणीची तयारी पूर्ण

कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.  कसबा पेठ विधानसभा निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. श्रीमती किसवे- देवकाते आणि भंडारे यांनी आज प्रशिक्षणादरम्यान मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी करताना घ्यायची काळजी, भरायचे विविध नमुने (फॉर्म) आदीबाबत सूचना दिल्या. इव्हीएमवरील उमेदवारनिहाय मतांची मोजणी आणि नोंद, फॉर्म भरणे, निवडणूक आयोगाच्या एन्कॉर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये माहिती भरणे, मतमोजणीनंतर पुन्हा इव्हीएम सीलिंग करणे, साहित्य पुरवठा याबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आली.

कसब्यात मतमोजणीच्या २० फेऱ्या

कसबा मतदार संघाची मतमोजणी आज (२ मार्च ) सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होणार आहे. त्यासाठी मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे ५०  अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

चिंचवडमध्येही मतमोजणीची तयारी पूर्ण- मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केली. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार असल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.  इटीपीबीएस( इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम फॉर सर्व्हीस वोटर) या प्रणालीच्या प्रात्यक्षिक कामकाजाची चाचणीसह डॉ.देशमुख यांना माहिती दिली. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्यादृष्टीने निवडणूक यंत्रणेची आवश्यक सर्व तयारी पुर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

शहरातील मध्यभागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार

संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून कोरेगाव पार्क भागातील अन्न धान्य महामंडळाचे गोदाम, तसेच शहरातील मध्यभागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. निकालानंतर विजयी मिरवणूक काढण्यास पोलिसांनी मनाई करण्यात आली आहे.

कसबा पोटनिवडणुकीतील मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या, तसेच पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले. आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, निकाल जाहीर होण्यास २४ तास राहिले आहेत. गुरुवारी (२ मार्च) दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बुधवारी (१ मार्च) पोलीस आयुक्तालायात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.

निकाल जाहीर झाल्यानंतर संभाव्य अनुचित घटना आणि कार्यकर्त्यांमधील वाद टाळण्यासाठी पोलिसांकडून कोरेगाव पार्क येथील शासकीय अन्न धान्य महामंडळाचे गोदाम, तसेच मध्यभागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियाननगर, कासेवाडी भागात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरेगाव पार्कमधील गोदामात मतमोजणी होणार असून, तेथील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके मध्यभागात गुरुवारी गस्त घालणार आहेत.

समाजमाध्यमावरही पोलिसांचे लक्ष

समाजमाध्यमात आक्षेपार्ह मजकुरावर पोलिसांची नजर राहणार आहे. सायबर गुन्हे शाखेचे पथक समाजमाध्यमातील संदेशांवर लक्ष ठेवणार आहे. गैरप्रकार तसेच आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला नाही. निकालानंतर शहरात काही पडसाद उमटल्यास संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची नजर राहणार आहे. निकालापूर्वी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *