नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)– गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे सोमवारी दुख:द निधन झाले. त्यांचे पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, आज सकाळी हॉस्पिटलमधून त्यांना फुफ्फुसातील संसर्गामुळे सेप्टिक शॉक आल्याची माहिती माहिती कळाली होती.
मुखर्जी यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर होती. तेव्हापासून ते कोमामध्येच होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सेप्टिक शॉक झाल्यास ब्लड प्रेशर काम करणे थांबवते आणि शरीराच्या अवयवांना त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही.
१० ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे मुखर्जी यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल होतानाच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांच्या श्वसनमार्गात संसर्ग झाला होता.
मुखर्जी यांनी सन २०१२ ते २०१७ या काळात भारताचे ते १३ वे राष्ट्रपती होते. त्यांच्या मागे कुटुंबात दोन मुले आणि एक मुलगी आहे.