पुणे – कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असतो याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.
पुण्यात कोरोना संदर्भात आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या फोटोबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी, “जाऊ द्या आता त्याला काय… पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो. आता करता करणार काय? तिथे फोटो याच्यासाठी असेल की, शंभर रुपये लिटरने तुम्ही पेट्रोल भरताहेत, तर त्यांच्या साक्षीने आपण भरतोय,” असं पवार म्हणाले.
तुमच्यासाठी पण त्यांचा फोटो असेल का? असं प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले,’मी काय वेगळा लागून गेलोय का? तुमच्या माझ्यासहीत सर्वच नागरिकांच्या प्रमाणपत्रावर असणार. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत म्हणून त्यांनी ते आणलंय. त्याची पब्लिसिटी किती करावी? आम्ही प्रमाणपत्र देताना कुणाचेही फोटो.. तसलं काही नाही केलेलं. माणसांना यातून कसं बाहेर काढता येईल, असा विचार केला पाहिजे.”