पुणे— कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता तिसरी लाट अटळ असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या लाटेचा अंदाज न आल्याने बेड, ऑक्सीजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन यांच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडाला तर अनेकांना त्यामुळे प्राण गमवावे लागले. तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने केला जाईल अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याने पुण्यात देशातलं पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारलं जाणार आहे. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात चाईल्ड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 200 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. या हॉस्पिटलसाठी चार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
दीड महिन्यात हॉस्पिटलचं काम करणार पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग अधिक होण्याचा धोका लक्षात घेऊन चाईल्ड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्याची परिस्थिती दिलासादायक
पुण्यातील कोरोनाच्या उद्रेक काही प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र पुणे शहरात काही दिवसांपासून दिसत असून पुणेकरांना काहीसा दिलासा त्यामुळे मिळाला आहे. दररोजच्या नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट होत असून नवीन रुग्णांच्या तुलनेत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे तर पुण्यातील मायक्रो कंन्टेमेंट झोनची संख्याही दहा दिवसात घटली आहे. 497 वर गेलेली मायक्रो कंन्टेमेंट झोनची संख्या 178 ने घटून ती दहा दिवसांत 312 वर आली आहे.
मात्र, असे असले तरीही पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पालिका जाहीर करते. पुण्यात सध्या हडपसर, मुंढवा, धनकवडी कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. हडपसरमध्ये 62 तर धनकवडीत 54 मायक्रो कंन्टेमेंट झोन आहेत.