हॉकी स्पर्धांच्या आयोजनात कोट्यवधींचा गैरप्रकार? : निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची रणवीर सिंग यांची मागणी


पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने गेल्या वर्षीच्या अखेरीस  आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धांच्या वेळी हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या घटनेमध्ये ज्या पदांची तरतूद नाही, त्या पदांची नियमबाह्य पध्दतीने नियुक्ती करून जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांचे प्रायोजकत्व घेतले गेले आणि  महापालिका आयुक्त राजेश पाटील, तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि हॉकी महाराष्ट्र संघटनेने या स्पर्धांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा सकृतदर्शनी गैरप्रकार केला असल्याचा आरोप ‘द हॉकी महाराष्ट्र’चे सरचिटणीस रणवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत केला. या गैरप्रकाराची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी आणि सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे रणवीर सिंग यांनी सांगितले.

रणवीर सिंग म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेने “हॉकी महाराष्ट्र” या राज्य पातळीवरील बोगस संघटनेशी हातमिळवणी करून जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धांवर लाखोंचा खर्च केला जात आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून हॉकी महाराष्ट्र संघटना बोगस असल्याची निवेदनाद्वारे पुराव्यासह कागदपत्रे रणवीर सिंग यांनी सादर केली. परंतु हॉकी महाराष्ट्र संघटनेला मदत करण्याचे, वरून आदेश असल्याचे सांगत आयुक्त राजेश पाटील यांनी कागदपत्रांची साधी दखलही घेतली नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला नोंदणीकृत संघटनेच्या पदावर नियुक्ती हवी असल्यास वरिष्ठ कार्यालयाची रीतसर परवानगी घेतल्याशिवाय काम करता येत नसताना पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची अध्यक्ष हितेश जैन, सचिव मनोज भोरे यांनी हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या उपाध्यक्षपदी (असोसिएटेड व्हाइस प्रेसिडेंट) नियुक्ती केली. हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या घटनेमध्ये या पदाची तरतूद नसतांना नियमबाह्य पध्दतीने नियुक्ती करून जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांचे प्रायोजकत्व घेतले गेले आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील, तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि हॉकी महाराष्ट्र संघटनेने या स्पर्धांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा सकृतदर्शनी गैरप्रकार केला असल्याचे स्पष्ट होत आहे.

राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळातील या घोटाळ्याबाबत अधिक माहिती देताना रणवीर सिंग म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने गेल्या वर्षीच्या अखेरीस जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हॉकी महाराष्ट्र या संघटनेची रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे सहा.धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करण्यात आलेली आहे. ही सर्व नोंदणीच बोगस असून बनावट कागदपत्रांच्या आधारे संघटनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. हॉकी महाराष्ट्र संघटनेची नोंदणी अलिबागमध्ये आणि संघटनेचे पदाधिकारी मुंबई, पुण्यात राहणारे असा प्रकार आहे. त्यामधील फिरोज शेख हे जालना जिल्ह्याचे अध्यक्ष असून ते पुण्यात राहतात तसेच ते हॉकी पुण्याचे सचिव ही होते, तसेच ते एसएनबीपी स्कुलचे क्रीडा संचालक म्हणून नोकरी करतात. त्याचप्रमाणे ते पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी देखील आहेत. फिरोज शेख हे पुण्याचे स्थायिक असल्याने त्यांना पुणे जिल्हा क्रीडा विभागाचा शासनाचा “क्रीडा मार्गदर्शक” म्हणून रोख रुपये व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे. श्रीमती जसिंटा जाधव ह्या पुण्यात नोकरी करून, वास्तव्यास पुण्यात असून हॉकी धुळे जिल्ह्याच्या पदाधिकारी आहेत. तसेच त्या हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या तत्कालीन खजिनदार व विद्यमान उपाध्यक्ष म्हणून नियुक्त आहेत. विजय खन्ना हे हॉकी महाराष्ट्र संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष असून ते मुंबईत वास्तव्यास असून त्यांना हॉकी सातारा चे पदाधिकारी म्हणून दाखवण्यात आले आहे. पराग ओझा हे पुण्यात वास्तव्यास असून ते अकोला हॉकी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असून ते हॉकी महाराष्ट्र संघटनेत खजिनदार म्हणून काम पाहतात. हॅरी राजाराम अँटनी हे पुण्यात राहत असून त्यांचा वास्तव्याचा पत्ता खारघर चा दाखवण्यात आला आहे. ते हॉकी महाराष्ट्र संघटनेचे प्रमोटर आहेत. तसेच सुहास धोंडू उतेकर हे रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव असून ते हॉकी महाराष्ट्र संघटनेचे तत्कालीन सह सचिव व विद्यमान कार्यकारी सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सुहास उतेकर यांची हॉकी रत्नागिरी संघटना सन २०१५ पासून नोंदणीकृत नसून त्यांना नोंदणीबाबत प्रमाणपत्र देखील देण्यात आलेले नाही. याचा अर्थ सुहास उतेकर हे रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव नसून त्यांनी आतापर्यंत हॉकी महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या आशीर्वादाने सन २०१५ पासून आजपर्यंत हॉकी महाराष्ट्र संघटनेवर मोठ्या पदांवर नियुक्ती करून वर्चस्व गाजवलेलं आहे. सुहास उतेकर या तोतया सचिवांनी हॉकी महाराष्ट्र संघटनेने आयोजित केलेल्या जिल्हा व राज्य पातळीवरील स्पर्धेत हॉकी रत्नागिरी जिल्ह्याच्या नावावर इतर मुलांना खेळवून रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक मुलांवर अन्याय करून फसवणूक केलेली आहे.

अधिक वाचा  मागासवर्ग आयोगावर दबाव असल्याची चर्चा

त्याचप्रमाणे सचिव मनोज भोरे यांच्यासोबत त्यांच्या हॉकी महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीमध्ये नोंदणी केल्यापासून म्हणजे २०१५ पासून त्यांची पुण्यातील निकटवर्तीय उपाध्यक्ष मनीष आनंद हे राहणारे पुणे, ऑलिम्पियन विक्रम पिल्ले राहणार पुणे, ऑलिम्पियन अजित लाक्रा राहणार पुणे हे शासकीय कर्मचारी असून हेड कोच म्हणून काम पाहतात. सागरसिंग ठाकूर राहणार पुणे हे क्रीडा प्रतिनिधी म्हणून, रणविर सिंग भट्टी राहणार पुणे क्रीडा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. तसेच स्टेनली डिसुझा राहणार पुणे हे तांत्रिक संचालक म्हणून, एडगर मस्करन्स राहणार मुंबई व श्रीमती हेलन मेरी राहणार मुंबई आणि नोकरी सेंट्रल रेल्वेत कार्यरत असून ते मुंबईच्या संघटनेवर कोणत्याही पदावर नियुक्ती नसताना त्यांना प्रशिक्षक म्हणून हॉकी महाराष्ट्रावर नियुक्त करण्यात आले आहे. वरील कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी हे सचिव मनोज भोरे यांचे निकटवर्तीय असून, ते हॉकी महाराष्ट्रच्या सर्व स्पर्धांमध्ये त्यांची नेमणूक केली जाते. व इतर जिल्ह्यातील कोणत्याही सदस्यांना हॉकी महाराष्ट्रच्या कोणत्याही स्पर्धा किंवा इतर आयोजनात सहभागी करून घेतले जात नाही. याबाबतच्या अनेक तक्रारी त्या त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी हॉकी महाराष्ट्रकडे केलेल्या आहेत. हा प्रकार हॉकी महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांच्या सहमतीने व पाठिंब्यामुळेच होत आहे. या सर्व गंभीर गैरप्रकाराची माहिती सहा. धर्मादाय आयुक्त, अलिबाग विभाग व अलिबाग पोलिस ठाण्यात रितसर पुराव्यासह तक्रार दाखल केलेली आहे. हॉकी महाराष्ट्र संघटनेने खेळाच्या नावाखाली पैशांची लूट करण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून कशा प्रकारे बोगस नोंदणी केली आहे, याचे सर्व पुरावे अलिबाग पोलीस ठाण्यात आणि धर्मादाय आयुक्त, अलिबाग यांच्याकडे दिलेले आहेत.

अधिक वाचा  लाखो कुटुंबांचा संसार वाचवण्याचा मार्ग मोकळा : वंचित बहुजन आघाडीचा महामोर्चा

पिंपरी-चिंचवड महापालिका हॉकी महाराष्ट्र या बोगस संघटनेला सोबत घेऊन जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धांचे आयोजन करत असल्याचे समजल्यानंतर, मी स्वतः महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची त्यांच्या कार्यालयात गेल्या वर्षी प्रत्यक्ष भेट घेतली होती. हॉकी महाराष्ट्र या संघटनेच्या बोगस नोंदणीची सर्व कागदपत्रे आयुक्त राजेश पाटील यांच्या समोर सादर केली. ही संघटना अधिकृत आहे का ? हे महापालिकेने तपासूनच त्यांना सोबत घेऊन स्पर्धांचे आयोजन करावे, अशी विनंती आयुक्त राजेश पाटील यांना त्यावेळ केली होती. परंतु त्यांनी आम्ही निवेदनाद्वारे पुराव्यासह दिलेली कागदपत्रे न पाहताच हॉकी महाराष्ट्रला मदत करण्याचे वरून आदेश असल्याचे सांगत आमचे कोणतेही म्हणणे त्यांनी ऐकून घेतले नाही. एका संघटनेसोबत स्पर्धांचे आयोजन करताना ती संघटना अधिकृत आहे किंवा कसे ? याची कोणतीही खातरजमा न करता महापालिकेसारख्या शासकीय संस्थेने हॉकी महाराष्ट्र या बोगस संघटनेसोबत नोव्हेंबर २०२१ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि त्यापूर्वी जिल्हा स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले होते. या हॉकी स्पर्धांवर पिंपरी-चिंचवडकरांच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली होती. एवढेच नाही तर या स्पर्धांसाठी कोट्यवधी रुपयांचे खासगी प्रायोजकत्वही घेण्यात आले होते. हे प्रायोजकत्व घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना हॉकी महाराष्ट्र या संघटनेचे उपाध्यक्ष करण्यात आले होते. शासकीय सेवेतील एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याला अशा प्रकारे नोंदणीकृत संघटनेचे पद घेण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. परंतु तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता हॉकी महाराष्ट्र या संघटनेच्या उपाध्यक्षपदावर हॉकी महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष हितेश जैन व सचिव मनोज भोरे यांच्या मार्फतीने स्वतःची निवड करून घेतली. सदर बाब ही माहिती अधिकारात प्राप्त झाली. त्यामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शासनाची परवानगी न घेता पदावर नियुक्त झाल्याने त्यांचेकडून भारत सरकारच्या “नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट कोड २०११ ” च्या नियमांचं उल्लंघन झालेले आहे. हॉकी महाराष्ट्र संघटनेने आणि माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी संगनमत करून पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत आयोजित केलेल्या जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धांसाठी कोट्यवधी रुपयांचे खासगी प्रायोजकत्व घेतले आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही स्वतःचा निधी खर्च केला. या दुहेरी खर्चाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. या स्पर्धांमध्येही मोठा घोळ घालण्यात आला आहे. एकाच जिल्ह्याचे तेच ते खेळाडू वेगवेगळ्या जिल्ह्याचे खेळाडू असल्याचे दाखवून या स्पर्धेतील सामने खेळवले गेले आहेत. त्यामुळे या स्पर्धा सुद्धा बोगस पध्दतीने आयोजित केलेल्या आहेत. याच्या तक्रारी संबंधितांना केलेल्या आहेत परंतु त्या तक्रारींची अद्यापही चौकशी झालेली नाही.

अधिक वाचा  रुचिका चौदाहा यांची कोलिअर्सच्या वरिष्ठ संचालक व कार्यालय सेवा प्रमुखपदी नियुक्ती

हॉकी महाराष्ट्र संघटना ही सन २०१५ पासून अस्तित्वात आलेली असून संघटनेचे अध्यक्ष हितेश जैन व सचिव मनोज भोरे यांनी घटनेप्रमाणे कामकाज न करता, लिखित स्वरूपातील दोन घटनांचा सोयीनुसार वापर करून घटनेतील नियमांना मनमर्जीपणे बगल देत कामकाजात अनियमितता करून, संघटनेच्या करीत असलेल्या लाखोंच्या व्यवहाराचा लेखाजोखा सहा.धर्मादाय आयुक्त अलिबाग यांना नियमानुसार न सादर करता, तसेच अलिबाग मधील हॉकी महाराष्ट्र संघटनेचे कार्यालय हे  संबंधितांनी मागे घेवुन बंद केल्याने, स्वतःच्या घरच्या पत्यावर संघटना चालवून, हॉकी इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. नरेंद्र बात्रा व तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आशिर्वादाने संघटनेचे कामकाज करीत आहेत. सचिव मनोज भोरे यांनी आपल्या पुण्यातील मर्जीतील खास पदाधिकाऱ्यांना संघटनेत मोठी पद देवुन, कामकाजात जी अनियमितता, गैरप्रकार, गैरव्यवहार व भ्रष्टाचार करीत असल्याने, या सर्व गैरप्रकाराबाबत तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रणवीर सिंग यांनी लेखी तक्रार केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर लेखी तक्रार अर्ज अधिक चौकशीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला पाठवली होती. पण स्वतः कृष्ण प्रकाश हेच पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त असल्यामुळे त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याला लोकसेवक या नात्याने मिळालेल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून, मनमानीपणे मी दाखल केलेल्या तक्रारीची अद्यापपर्यंत चौकशी करून दखल न घेता, माझ्या विरोधातच अदखलपात्र गुन्हा दाखल करायला लावलेला आहे. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे भोसरी एमआयडीसी पोलिसांनी मला याबाबत कलम १४९ ची नोटीस बजावून संशयास्पद हालचाली केल्यास आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मी हॉकी महाराष्ट्र या बोगस संघटनेची रीतसर तक्रार करतो म्हणून माझाचा आवाज दाबण्याचा हा प्रकार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केला आहे.

त्यामुळे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील या दोघांनी शासकीय पदावर राहून शासनाची दिशाभूल करून एका राज्य पातळीवरील बोगस संघटनेशी हातमिळवणी करून जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे केलेले आयोजन, त्यावर पिंपरी-चिंचवडमधील सामान्य जनतेच्या करामधून झालेला लाखोंचा खर्च, स्पर्धेसाठी प्रायोजकत्वाच्या नावाखाली गोळा केलेले सुमारे कोट्यवधी रुपये, प्रायोजकत्व गोळा करण्यामध्ये आयुक्त राजेश पाटील व तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची एक लोकसेवक या नात्याने यामध्ये असलेली प्रत्यक्ष भूमिका, स्पर्धेच्या नावखाली शासनाची झालेली फसवणूक व नियमांचे जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर केलेले उल्लंघन तसेच संबंधितांनी मनमर्जीनुसार दिशाभूल करून केलेला पदाचा दुरुपयोग या सर्व बाबींची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हॉकी महाराष्ट्र या राज्य पातळीवरील बोगस संघटनेला हाताशी धरून खेळाच्या नावाखाली झालेल्या सुमारे कोट्यवधी रुपयांच्या गैरप्रकाराची निवृत्त न्यायाधीशांच्यामार्फत सखोल चौकशी होऊन सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे रणवीर सिंग यांनी सांगितले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love