पुणे-क्रिकेटच्या मैदानावर चिअर्स गर्ल्सना नाचताना आपण अनेकदा पाहिलं असेल. मात्र बैलगाडा शर्यतीत नऊवारी साडीत, मराठमोळ्या पोशाखात चिअर्स गर्ल्स थिरकल्या असं म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल का? पण हो हे खरं आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पांगरी गावात हे घडले. पांगरी गावातील रोकडोबा महाराजांचा यात्रा उत्सव पार पडला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान चक्क चियर्स गर्ल्सनाही बोलवण्यात आले होते.
कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागू होते. महाराष्ट्र सरकारने नुकतेच हे निर्बंध उठवले. त्यानंतर पुन्हा एकदा गावोगावच्या यात्रा आणि जत्रेत जल्लोष सुरू झालाय. सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे त्यामळे यंदाच्या जत्रांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतोय.
पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जत्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलं जातं. पुणे जिल्ह्यातील पांगरी गावात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत भरघोस बक्षिसंसह नागरिकांच्या मनोरंजनासाठी चिअर्स गर्ल्सना आणण्यात आले होते. त्यामुळे या गावातील जत्रा नागरिकांचा आकर्षणाचा विषय ठरली होती.
आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर तोकड्या कपड्यात थीरणाऱ्या चिअर्स गर्ल्स बैलगाड्यांच्या शर्यतीनंतर मराठी गाण्यावर थिरकत होत्या. नऊवारी साडी, नाकात नथ आणि सोळा सिंगार करून सजलेल्या या चिअर्स गर्ल्ससाठी स्वतंत्र स्टेजची उभारणी करण्यात आली होती. बैलगाड्यांच्या शर्यतीनंतर मराठी गाण्यावर थिरकणार या चिअरगर्ल्स पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरल्या आहेत.