पंढरपूर- पंढरपूर पोटनिवडणुक राजकीय रणधुमाळीने गाजते आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे नेते यांच्यातील शाब्दिक द्वंद्व चांगलेच रंगले आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करून मतदारांना आकर्षित करण्याचा सपाटा या नेत्यांनी लावला आहे. महाविकास आघाडी सरकार पडणार असे भाकीत करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांना मोदी लाटेत लॉटरी लागली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीही देणघेणं नाही, अशा शब्दांत टीका केली.
चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणं नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाचा झंझावात आल्यामुळे त्यांना लॉटरी लागलेली आहे. ही गोष्ट पंढरपूरच्या मतदारांनी समजून घ्यावी. शेतकरी आणि गोरगरीबांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भगीरथ भालके यांना प्रचंड मताधिकाऱ्याने विधानसभेवर निवडून पाठवा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
















