पुणे—मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला केंद्र आणि राज्यातून पाठिंबा असल्याचं दिसत आहे. दोघांनीच सरकार चालवण्याला त्यांचे राज्यातील सहकारी आणि देशातील नेतृत्व या दोघांचीही संमती आहे. त्यामुळे सत्ता एककेंद्रीत करण्याच्या विचाराने दोघेच कारभार पाहत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराबाबत बोलताना लगावला. हे साहाजिक आहे. ते सत्ताधारी आहेत, ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावं लागेल,असंही पवार म्हणाले.
पुण्यामध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांना राज्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार रखडला असून त्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली. यावर उत्तर देताना पवार यांनी सत्ता एककेंद्रीत करण्याच्या विचाराने दोघेच कारभार पाहत असल्याचा टोला लगावला. दोघांनीच संपूर्ण सत्ता केंद्रीत ठेऊन सरकार चावलायचं ही भूमिका स्वीकारलेली दिसते, असं मत व्यक्त केलं.
शिंदे यांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा तथ्यहीन
“आधीच झेड सुरक्षाव्यवस्था असलेल्या एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीचे पालकमंत्री या नात्याने अधिक सुरक्षा होती. त्यामुळे शिंदे यांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा तथ्यहीन आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही एकनाथ शिंदे यांची सुरक्षाव्यवस्था तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढून घेतली होती, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला होता. त्यासंदर्भात विचारले असता शरद पवार यांनी हे भाष्य केले.
पवार म्हणाले, “मला वस्तुस्थिती माहित नाही. पण, शासनात अनेक वर्ष काम केल्याने मला हे माहिती की सुरक्षा पुरवण्याचा निर्णय मंत्रीमंडळ घेत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याची चर्चा होत नाही. मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्या समितीमध्ये त्याचा निर्णय होतो. एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था होती आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना अधिक सुरक्षा होती. माजी गृहमंत्र्यांनी हे सांगितले आहे. त्यामुळे अधिक काही बोलायची गरज नाही.”
त्यांनी दगड मनावर ठेवावा की डोक्यावर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न –
राज्यातील सत्ताबदलासाठी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे लागले, या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानासंदर्भात विचारले असतात्यां,नी दगड मनावर ठेवावा की डोक्यावर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याविषयी मला काही बोलायचे नाही, असे पवार म्हणाले.
पोराबाळांच्या मुद्द्यावर मी बोलणं योग्य नाही
नारायण राणे यांना संपविण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यासंदर्भात विचारले असता “पोराबाळांच्या मुद्द्यावर मी बोलणं योग्य नाही”, अशी टिप्पणी पवार यांनी केली.
“माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा एकनाथ शिंदेप्रमाणेच त्यांनाही मारण्यासाठी तथाकथित शांत आणि संयमी पक्षप्रमुखांकडून सुपाऱ्या देण्यात आल्या. हे ‘म्याव म्याव’ आता संपवून टाकूया आणि आपण व्याजासह वस्त्रहरण सुरु करु,” असा आरोप नितेश राणे यांनी ट्वीटरवरुन केला आहे. त्याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी “पोराबाळांच्या मुद्द्यावर मी बोलणं योग्य नाही”, असे म्हणत काढता पाय घेतला.