शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरेंइतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही: पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही- शरद पवार

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–काही ग्रंथ, काही पुस्तके ही महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झाली. त्यांच्या हजारो प्रती निघाल्या आणि लोकांनी घरा-घरात त्या ठेवल्या, वाचल्या. दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केलेला नाही. मला बाबासाहेब पुरंदरेंचं लिखाण कधीच पटले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सत्यावर आधारित नवा इतिहास नव्या पिढीला आपणास द्यायचा आहे,पाखंडी इतिहास नको, असेही ते म्हणाले.

डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचार प्रवाह’ ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शाहू महाराज, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील उपस्थित होते.

पवार म्हणाले, “जे काही लिखाण बाबसाहेबांनी केलं, जी काही मांडणी त्यांनी केली. ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे, तो घटक कधीही मान्य करणार नाही.  त्या व्यक्तींचं महत्व वाढवण्यासाठी त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. रामदासाचं योगदान काय? दादोजी कोंडदेवाचं योगदान काय? या सगळ्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण एक गोष्ट चांगली झाली. की महाराष्ट्र सरकारने एका काळात उत्तम खेळाडूंना दादोजी कोंडदेव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यावर वाद-विवाद झाले आणि २००८ मध्ये राज्य सरकारने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक, गुरू होते का नाही, याचा सखोल अभ्यास करण्याचे काम समितीवर सोपवले. त्या समितीने सखोल अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला, की दादोजी कोंडदेव व शिवछत्रपतींचा काहीच संबंध नव्हता. शिवाजी महाराजांना जर कोणी दिशा दिली असेल तर ती राजमाता जिजाऊंनी दिली आहे. यानंतर दादोजी कोंडदेव हा पुरस्कार काढण्यात आला.”

पवार म्हणाले, शिवाजी महाराजांवरील लिखाणात आतापर्यंत काहीजणांनी सत्य तर काहींनी असत्य लिखाण केले. परंतु कोकाटे यांनी एकत्रितरित्या सत्य गोष्टींचे लिखाण केले. देशात अनेक राजे होऊन गेले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे जनतेचे राज्य होते. राज्य चालविण्याचा वेगळा दृष्टीकोन राजेंनी मांडला. शेती, धर्म, न्याय आदी विषयक धोरण कोकाटे यांच्या पुस्तकात मांडण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडवर महात्मा फुले यांनी शोधून काढली. जमिनीशी बांधलकी असलेला कुलवाडीभूषण राजा असा उल्लेख त्यांनी केला होता.

शिवाजी महाराजांच्या कार्यात रामदास यांचे योगदान काय? दादोजी कोंडदेवचे योगदान काय?

शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काहीजणांनी अन्य धर्मियांशी संकुचित विचार मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो खोडून काढत उदाहरणासह पुस्तकात मांडण्यात आला. शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात रामदास यांचे योगदान काय? दादोजी कोंडदेवचे योगदान काय? अशा अनेकजणांचे संबंध जाणीवपूर्वक जोडले गेले. दादोजी कोंडदेव व शिवाजी महाराजांचा कोणताही संबंध नव्हता. राजेंना दिशा देण्याचे काम जिजाऊ माता यांनी केले. इतिहासातील अनेक सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यामुळे मी खोलात जात नाही.

काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली, तर काहींनी धादांत खोटी माहिती दिली. पण श्रीमंत कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. भारतात अनेक राज्यकर्ते झाले. मौर्यांचे राज्य, अशोकाचे राज्य, यादवांचे राज्य, पण शिवाजी महाराजांचे राज्य या पेक्षा वेगळे होते. कारण त्यांचे राज्य कधी भोसल्यांचे राज्य झाले नाही, ते रयतेच राज्य म्हणूनच ओळखल गेलं. आपल्याला सत्यावर आधारित नव्या पिढीला प्रेरणा देणारा वास्तव इतिहास पाहिजे. असंही त्यांनी नमूद केलं

कोल्हापूरचे दिवगंत कॉ. गोविंद पानसरे यांनी जे पुस्तक लिहिले त्यातन छत्रपतींच्या कालातील वास्तव समोर आले ते विसरता येणार नाही. सत्यावर आधारित नवा इतिहास नव्या पिढीला आपणास द्यायचा आहे. पाखंडी इतिहास नको.

छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केले ते महत्वाचे आहे. आज काळ असा आला आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. आपल्याला कोणती दिशा घ्याची हे समजत नसल्याने त्याबाबत चिंतन करावे. ज्यांच्या कार्यातून स्फुर्ती, दिशा मिळते त्यांची प्रेरणा घेऊन वाटचाल केली पाहिजे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी राजेंनी जे काम केले ते पुढे सुरु राहिले पाहिजे. जनतेला जो न्याय देतो तोच राजा असतो. छत्रपती कोणत्या एका जाती, व्यक्तीचे नसून त्यांनी सर्व समाजासाठी काम केले. राज्यात जे परिवर्तन झाले ते चांगल्यासाठी की वाईटासाठी, हें माहिती नाही परंतु भविष्यात चांगले काम घडावे ही अपेक्षा आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *