सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष छत्रपती राजर्षी शाहु महाराज

महाराष्ट्र लेख
Spread the love

१९ व्या शतकाच्या सुरवातीला मराठेशाही संपुन इंग्रजांच्या राजवटीला सुरवात झाली आणि महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने अधुनिक युगाच्या निर्माणालाही सुरवात झाली असे म्हणायला पाहिजे. कारण याच कालखंडात प्रखर राष्ट्रवादाचा जन्म झाला. अखंड हिंदुस्तानची आणि भारतीय एकात्मतेची कल्पनाही याच काळात वाढीस लागली. त्यापुर्वी छोटी छोटी संस्थाने आणि राज्ये आपापली अस्मिता जपत एकमेकांबरोबरचे वैर पाळत आपले छोटेखानी अस्तीत्व राखुन ठेवण्यात धन्यता मानत होती. पण आता सर्वांचा शत्रु एकच होता तो म्हणजे फिरंगी या समान भावनेने हिंदुस्तान एक व्हायला सुरवात झाली होती. प्रखर राष्ट्रवाद, समता आणि न्याय इत्यादी विचार प्रवाहांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरवात केली होती आणि या बरोबरच या कालखंडात महाराष्ट्रात सामाजिक विषमता निर्मुलन चळवळींनीही आपले पाय पसरायला सुरवात केली होती. या सगळ्याची पार्श्वभुमी अतिशय दयनिय होती. जातीय विषमतेने कळस गाठलेला होता. अस्पृशांना पशुपेक्षा हीन वागणुक दिली जात होती. स्रीयांना बालविवाह, सतीप्रथा सारख्या अनेक अमानवीय चालीरीतींना, अंधश्रध्दांना बळी पडावं लागत होतं, शिक्षणाविषयी प्रचंड उदासिनता आणि अबाळ होती. अशा परिस्थीतीत समाजव्यवस्थेच हे रुप बदलायलाच पाहिजे असे अनेक समाजसुधारकांना वाटने सहाजिकच होतं. अशावेळी राजपदाचा आपल्या वैयक्तिक सुखासाठी उपयोग करुन घेण्याऐवजी बहुजन समाजाला त्यांच्यावर लादलेल्या अमानवी सामाजिक आणि धार्मिक बंधनातुन मुक्त करायला सर्वात आधी पुढे आलेले एकमेव राजे म्हणजे राजर्षी शाहु महाराज.

समरसता हे एक जीवनमुल्य आहे आणि लोकअराधना हाच त्याचा आधार आहे याची जाणिव शाहु महाराजांनी आपल्या जीवनीतुन जगाला करुन दिली. ब्रिटीशांचा अंमल असतानाही शिक्षण, समता, न्यायावर आधारीत तसेच जातीभेद विरहीत लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावे असे स्वप्न ज्यांनी पाहीले आणि त्यासाठी आजीवन कार्यरत राहीले ते समरसतेचे सरताज राजर्षी शाहु महाराज हे एकमेवाद्वितीय होते. स्वातंत्र्यपुर्व काळात अठराशे सत्तावनच्या ऊठावानंतर राणी व्हिक्टोरियाने केलेल्या १८५८ च्या जाहीरनाम्यानुसार अस्तित्वात आलेली ५९९ संस्थाने स्वातंत्र्यपूर्व भारतात होती ज्यामध्ये आपल्या कार्य कौशल्यातुन मानवतेचा उदात्त हेतु मनात बाळगत प्रागतिक सामाजिक परिवर्तन घडवुन आणणारे. सामाजिक रुढी परंपरेविरुध्द जाऊन शिक्षण, समता, आणि बंधुत्व ही मुल्ये रुजवताना अनेक समाजोपयोगी सुधारणा घडवुन आणणारे व त्यासाठी आवश्यक ते कायदे करणारे. हे करताना शेती, धरणे, उद्योग-व्यवसाय व कला या क्षेत्रातही लोकसहभागातुन नेत्रदिपक सुधारणा घडवुन आणत राज्याचा विकास साधणारे आणि ईतर संस्थानांसाठी एक आदर्श निर्माण करणारे छत्रपती राजर्षी शाहु महाराजांचे कोल्हापुर संस्थान हे सर्वात आघाडीवर होते.

अस्पृश्य समाजाच्या व्यथांची जाणिव असणारा महात्मा फ़ुलेंच्यानंतर एखादा अपवाद असु शकेल पण या प्रश्नावर फ़ार काही कार्य होताना दिसत नव्हते. अशा वेळी शाहु महाराज ग्रीष्मात थंड हवेचा झोत यावा तसे आपल्या प्रजाजनाच्या जीवनात सुखासमाधानाची लहर बनुन आले. शाहु महाराजांनी सर्वप्रथम राज्यकारभारात सुव्यवस्था आणण्यासाठी राजप्रतिनिधि मंडळाला दिलेले राज्यकारभाराचे हक्क रद्द केले आणि त्यांचे सल्लागार मंडळात रुपांतर केले. संस्थानाच्या आर्थिक परिस्थितीत व शासन व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी इनामदारांना आणि जमीनदारांना नाममात्र दराने कर्ज देऊन त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा भार हलका केला. सरकारी राखीव वनात गुरे चारण्याचे नियम जाहीर केले. सावकरांच्या कचाट्यातून शेतकर्‍यांना सोडवण्यासाठी शेतकर्‍यांच्या गुरांचा लिलाव दिवाणी न्यायालयाने करु नये असा हुकुम काढला. अवघे २० वर्ष वय असलेले शाहु महाराज छत्रपती म्हणुन अतीव उत्साहाने कामे करत होते. अनेक खेड्यांना भेटी देताना गावकरी शेतकरी यांना शाहु महाराजांना सहज भेटता येई. त्यांच्या गरजा त्यांचे प्रश्न याविषयी शाहु महाराज त्यांच्याशी सरळ संवाद साधत. हे करत असताना त्यांचे निरिक्षणही चालु असे. आपली गरीब, दलित, प्रजा कोणत्या प्रकारचे अन्न खाते, अंगावर कशा चिंध्या वापरते. तीला दैनंदीन जीवनात कोणते प्रश्न भेडसवतात हे ते जाणुन घेत. खेडुतांच्या साध्या कदान्नाचे आनंदाने सेवन करत. प्रजेच्या तक्रारी त्यांचे प्रश्न शांततेने ऐकुन घेत आणि ती दुर करण्यासाठी तत्काळ उपाय योजना करत. शाहु महाराजांच्या या कृतीमुळे प्रजेमध्ये आपल्या राजाविषयी अत्यंत आदर, जिव्हाळा आणि प्रेम उत्पन्न झाले यात् नाही. दरम्यान ज्यावेळी शाहुंच्या लक्षात आले की राज्यकारभारामध्ये अनेक जातीचे लोक घेतल्यास राज्यकारभारात समतोलपणा येऊ शकतो त्यावेळी त्यांनी मोठ्या अधिकार्‍यांच्या जागी बहुजन वर्गातील व्यक्तिंची नेमणुक केली. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या दिमतीला गरीब वर्गातील लोक ठेवले. हेतु हा की गरीब वर्गासाठी जे हुकुम काढले त्याची नीट अंमलबजावणी होते की नाही हे त्यांच्याकडुन कळावे. अशा रीतीने आपल्या राज्यकारभारासाठी एकनिष्ठ आणि कर्तृत्ववान प्रशासकांचा वर्ग शाहु महाराजांनी तयार केला.

याच दरम्यान महाराजांनी अनेक शाळांना भेटी दिल्या. ज्ञान हे सामाजिक उध्दाराचे, सामाजिक शक्तीचे, ऐहिक समृध्दीचे आणि सत्तेचे मुख्य उगमस्थान आहे हे महाराजांना अनुभवाने माहीत होते. बहुजन समाज सुशिक्षित झाल्याशिवाय त्यांचा उध्दार होणार नाही त्यांच्या मागासलेपणाचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्यातील शिक्षणाचा आभाव हे त्यांना माहीत होते. जर राज्यकारभार सर्व थरांतील लोकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या चालवायचा असेल तर राजाला संयोजनशील, गतिशील आणि बहुजनहितप्रवण असायला हवे. त्यामुळे त्यांनी दुर्बल, निरक्षर, मागासवर्गीय आणि दलित या बहुजनांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याच्या अनेक योजना आखल्या आणि त्या प्रत्यक्षात आणल्या. आपल्या कारकीर्दीत त्यांनी सुमारे शंभर शाळा काढल्या. प्राथमिक शिक्षणाला आग्रक्रम देतानाच उच्च शिक्षणाकडेही लक्ष पुरवले. यापुर्वी महाराष्ट्रात खेड्यापाड्यातील दलित आणि मागास वर्गात शिक्षणाचा प्रसार करणारी पहीली संस्था म्हणजे महात्मा फ़ुलेंनी स्थापन केलेली सत्यशोधक समाज ही होय. मागासवर्गीयांच्या शिक्षणातील अडसर दुर व्हावेत खेड्यापाड्यातुन येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय व्हावी म्हणुन शाहु महाराजांनी वसतिगृहे बांधली. त्याच प्रमाणे विविध समाजातील लोकांना अनुदान देऊन वसतिगृहे बांधण्यास प्रोत्साहनही दिले.

२६ जुन १९०२ ला होणा‍र्‍या सातव्या एड्वर्डच्या राज्यारोहनाला उपस्थित राहण्यासाठी शाहु महाराज इंग्लंडला गेले पण तेथुन अनेक अनुभव आणि योजना घेऊन परत आले. इंग्लंडमधील प्रवासाचा शाहुं महाराजांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांचा दृष्टीकोणच बदलला. गरीबांची ऊन्नती कशी करावी हा जो विचार त्यांच्या मनात घोळत होता त्याला गती मिळाली. मागासवर्गीयांची प्रगती करण्याच्या त्यांच्या धोरणाला चालना मिळाली आणि २६ जुलै १९०२ ला करवीर गझेट्मध्ये त्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात म्हंटले होते की मागासवर्गीयांची प्रगती करण्याच्या आपल्या धोरणानुसार मागासवर्गीयांनी उच्च शिक्षण घेण्यास उद्युक्त व्हावे म्हणुन त्या वर्गांना सरकारी खात्यात पुर्वीपेक्षा अधिक नोकर्‍या द्याव्यात असे आपण ठरविले आहे. तरी या जाहीरनाम्याच्या दिवसापासुन ज्या जागा रिकाम्या होतील त्यातील ५०% जागात मागासवर्गातील सुशिक्षित तरुणांची भरती करावी अशी आपली इच्छा आहे. सर्व सरकारी कार्यालयामध्ये जेथे जेथे ५०% पेक्षा कमी नोकर असतील तेथे तेथे ह्या वर्गातील तरुणांची नेमणुक करावी. हा केवळ साधा जाहीरनामा नव्हता तर भारतात दिले गेलेले पहीले आरक्षण होते त्यामुळेच तो फ़क्त कोल्हापुरातच नव्हे तर संपुर्ण भारतात नव्या युगाच्या आगमनाची नांदी घेऊन आला होता.

आपले समाजक्रांतीचे कार्य शाहु महाराजांनी केवळ आपल्या संस्थानापुरते मर्यादीत न ठेवता इतर संस्थानिकांनाही हे कार्य करण्यासाठी उद्युक्त केले. इंदुरच्या महाराजांना या कार्याविषयी प्रोत्साहन देताना ते म्हणतात की “लग्नकार्यातील जातीबंधने मोडुन काढुन राजघराण्यातील मुलांनी ज्या मराठा कुटुंबाची सत्ता व प्रतिष्ठा त्यांच्यापेक्षा कमी दर्जाची आहे अशा घराण्यातील मुलींशी संबंध जोडावेत. जर गरीब असलेल्या उच्च जातीच्या मराठ्यांनी खालच्या समाजाशी विवाह संबंध जोडले तर त्याच्यावर जातीबहीष्कार पडेल अशी भीती असते. यासाठी उच्च जातींच्या लोकांनी कनिष्ठ जातींच्या लोकांशी विवाह जोडावेत असे त्यांचे मत होते. पुढे ते म्हणतात “आपण सामान्य जनतेमध्ये काम करतो अस्पृश्यांच्या उन्नतीमध्ये पुढाकार घेतो. कारण उक्तीपेक्षा कृती अधिक परिणामकारक ठरते. आपल्या धर्मात अस्प्रुश्यांना अमानुष वागणुक सांगितलेली आहे म्हणुन आपण त्यांना अमानुषपणे वागवतो. परिणामी ते इस्लाम किंवा ख्रिचन धर्म स्वीकारतात आणि धर्मांतर केलेल्या त्या लोकांना स्पर्श करायला आपल्याला अयोग्य वाटत नाही. असा भेदभाव वेदात सांगीतलेला नाही. ह्या गोष्टीत मी पुढाकार घेतल्यामुळे लोक माझे अनुकरण करतील. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपण ह्या गोष्टीत नेतृत्व करायला पाहीजे.” शाहु महाराजांचा हा संदेश आजही तितकाच उपयुक्त आहे.

शाहु महाराजांनी हिंदु वारसाहक्काचा निर्बंध १७ जानेवारी १९२० रोजी संमत केला. त्या निर्बंधाप्रमाणे शुद्रांची अनौरस संतती आणि ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य या त्रिवर्णांची अनौरस संतती यांच्या वारसाहक्कातील तफ़ावत नष्ट करण्यात आली. हे निर्बंध देवदासींनाही लागु करण्यात आले. या निर्बंधामुळे लबाडी नष्ट होऊन समता निर्माण झाली यावरुन शाहु महाराज आपल्या कालखंडाच्या किती पुढे होते हे जाणत्याच्या लक्षात येईल.

छत्रपती शाहु महाराज हे अस्प्रुश्यवर्गाचे तसेच पददलितांचे कैवारी आहेत अशी त्यांची किर्ती सर्वत्र पसरली. मात्र अश्पृशांनी त्यांचा नेता त्यांच्याच समाजातुन त्यांनी स्वत: निवडावा असे त्यांचे म्हणणे होते. आणि यासाठी ते अनेक दिवसापासुन झटत होते. याकामी शाहु महाराजांनी ग, आ, गवई या संपादक, कवी आणि त्यावेळचे अस्पृश्यांचे नेते यांना १९२० च्या सुरवातीला पत्र लिहुन विनंती केली की त्यांनी अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसाठी सवर्ण हिंदुंच्या नेतृत्वावर अवलंबुन राहु नये. आपला पुढारी आपल्या वर्गातुनच निवडावा. दरम्यान कोल्हापुरच्या शाहुंच्याच चळवळीतील दत्तोबा पोवारांनी शाहु महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घडवुन आणली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यवर्गाचे उदयोन्मुख पुढारी होते. छत्रपतींच्या सहाय्याने बाबासाहेबांनी “मुकनायक” नावाचे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० मध्ये सुरु केले होते. २२ मार्च १९२० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली माणगावला अस्पृश्यांची एक परिषद बोलावली होती शाहु महाराज हे त्या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रसंशा करत शाहु महाराजांनी आता तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे त्याच्या पाठीमागे सर्वशक्तिनिशी उभे रहा असा सल्ला जमलेल्या अस्प्रुश्यवर्गाला दिला.

राजर्षींचे जातिभेद निर्मुलनाचे कार्य असो, अस्पृशता निवारण्याचे कार्य असो वा शिक्षणप्रसाराचे कार्य असो कृतीयुक्त सामाजिक समरसता समाजात निर्माण व्हावी आणि सामाजिक न्यायाची स्थापना व्हावी असे त्यांना वाटत होते. स्वतंत्र भारतात झालेले सामाजिक सुधारणेचे सगळे प्रयत्न महाराजांनी त्यांचा संस्थानात आधीच म्हणजे स्वातंत्र्यापुर्वीच केलेले होते. म्हणुनच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी शाहु महाराजांना “सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष” अशा यथार्थ शब्दात गौरविले आहे.

काशिनाथ पवार, पुणे

९४२३४६९३२९, ९७६५६३३७७९

सदस्य : समरसता साहित्य परिषद – महाराष्ट्र राज्य

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *