‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’: प्रदीप भिडे यांच्या या वृत्तनिवेदनाला मिळाली होती दाद ..


News24Pune— आपल्या भारदस्त आवाजाने दूरदर्शनवरील नमस्कार, ‘आजच्या ठळक बातम्या’ अशी मराठी बातम्यांची सुरुवात करणारे जेष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं.  त्यांच्या बातम्या देण्याच्या अनुभवामधे नेमक्या धक्कादायक, दु:खद किंवा चित्तथरारक बातम्या देण्याचा प्रसंग श्री. भिडे यांच्यावर अनेक वेळा आला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्त्या, ख्यातनाम पार्श्वगायक महमद रफी यांचे निधन, मुंबईचा भीषण बॉम्बस्फोट, अशा घटनांची बातमीपत्रे श्री. भिडे यांनीच वाचली. निवेदकाने अशा वेळी भावनाविवश होता कामा नये. त्रयस्थाच्या भूमिकेतून तटस्थ राहून बातम्या सादर करणे आवश्यक. निवेदकाला व्यक्तीश: आनंद झाला वा दु:ख झाले तरी त्याला भावनांचे प्रदर्शन करता येत नाही. अलिप्तपणा म्हणजे कोरडेपणा नव्हे. आवश्यक त्या भावभावनांतून भिजलेली बातमी लोकांच्या कानावर पडायला हवी, असे ते म्हणत.

अधिक वाचा  पूजा वनदुर्गांची : सावरपाडा एक्स्प्रेस - कविता राऊत

२१ मे १९९१, भारतात श्रीपेरूंबदूर येथे ‘राजीव’जींची हत्त्या झाली. वृत्त संपादिका विजया जोशी यांनी भिडे यांना ‘असशील तसा त्वरीत निघून ये’, म्हणून सांगितलं. ही बातमी मुंबईत वा-यासारखी पसरली होती. मुंबई बंद. सर्वत्र स्मशान शांतता. पोलिसांच्या जीपने भिडे दूरदर्शन केंद्रावर आले. सकाळी ६.३० वाजता त्यांनी बातमी वाचली. तटस्थपणे बातमी वाचताना देखील अगदी नकळतपणे तिला एक कारूण्याची झालर होती. ‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’, अशा प्रतिक्रिया त्यांना बातमी झाल्या झाल्या लगेचच मिळाल्या. १९९४ चा बॉम्बस्फोट झाल्यावर त्या दिवशी साडेसात वाजता बातम्या देण्याची जबाबदारी भिडे यांची होती. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून ते दुपारी दीड वाजताच निघाले. रेल्वेने, पायी पायी असा प्रवास (अंधेरी ते वरळी) त्यांनी केला व सायंकाळी ५ वाजता पोहोचले. बातमी परिणामकारक रित्या सादर केली. त्याही परिस्थितीमधे लोकांनी त्यांच्या अचूक वृत्तनिवेदनाला दाद दिली.

अधिक वाचा  'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे बाप्पा यंदा ‘ॐकार महाला’त होणार विराजमान

पुण्यात होणा-या मातृपूजनाची बातमी मिळवून आपणहून सादर केली. सहा पिढयांपैकी पहिली आजीबाई ८५ वर्षांची तर, सहाव्या पिढीची तिची प्रतिनिधी ६ महिन्यांची ! या सचित्र बातमीचे सा-या महाराष्ट्रामधे कौतुक झाले. या बरोबरच क्वचितप्रसंगी मिलीमिटर व्यासा ऐवजी किलोमीटर व्यासाची पाईप लाईन असे गफलतीचे उल्लेखही झाल्याचे ते प्रांजळपणे सांगत. महमद रफी यांच्या निधनाच्या बातमीला देखील कारूण्याची छटा होती. भिडे यांनी ही बातमी सादर केली, तेव्हाही त्याला अशीच दाद मिळाली.

Credit -marathiworld.com

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love