मुंबई- राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत आजपासून अनेक कडक निर्बंध लावण्यात आले असून कडक नियम जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संकटाने सर्व व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दरम्यान, आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. उद्यापासून राज्यातील 13 अकृषी विद्यापीठांच्या कोणत्याही वर्षांच्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील असे सामंत यांनी सांगितले.
या तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. आज कुलगुरूंसोबत परिक्षासंदर्भात बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता ऊर्वरीत सर्व परिक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असे उदय सामंत यांनी सांगितलं.
दरम्यान, उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. यामुळं निकाल लवकर लागेल. राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा मनोदय आहे. 18 ते 25 वयोगटातील हे विद्यार्थी आहेत त्यामुळं त्याचं लसीकरण होणं गरजेचे आहे असेही सामंत म्हणाले.