पुणे- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी एका मंचावर एकत्र येणार याच्या बातम्या कालपासून प्रसार माध्यमांमध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवल्या जात आहेत. मात्र, कोरोनाविरुद्धाची लढाई सर्वांनी मिळून जिंकायची आहे. त्यामुळे राजकीय मतांमध्ये भिन्नता असली तरी अशा संकटाच्या काळात आरोप प्रत्यारोप न करता एकता टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आरोप-प्रत्यारोपाची ही वेळ नव्हे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याचे आज (दि.२८) उद्घाटन झाले. यावेळी अजित पवार बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रकांत पाटील, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार म्हटल्यावर प्रसार माध्यमांमध्ये ही ब्रेकिंग न्यूज झाली. परंतु त्यांना माहिती नव्हते की चंद्रकांत दादा पाटील येणार आहेत. त्यामुळे राजकीय भूमिका आणि मतं वेगवेगळी असू शकतात, मात्र निवडणूक झाल्यावर सगळं विसरुन जायचं असतं असे त्यांनी स्पष्ट केले.
“गेल्या रविवारपासून हा तिसरा कार्यक्रम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतः खर्च करुन हे रुग्णालय उभं केलं आहे, त्याचं अभिनंदन. नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या उपचारासाठी अडचण नको म्हणून हे रुग्णालय आहे. उद्या कुठल्याही नागरिकाला बेड उपलब्ध नाही, असं होता कामा नये, त्यासाठी हा चांगला प्रयत्न आहे” असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रात रोज 14 ते 15 हजार रुग्ण आढळत आहेत. पिंपरी चिंचवडचा रिकव्हरी रेट 85 टक्के आहे. यासाठी महापालिका आणि शासनाचे आभार” एवढंच बोलून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपले भाषण संपवले.