बारामती- आमच्या घरात माझी आई आशाताई अनंतराव पवार सर्वात ज्येष्ठ आहेत. आज माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. माझी आई घराण्यात सर्वात ज्येष्ठ असल्याचे अधोरेखित करुन शरद पवार यांना टोला लगावला. तर दुसरीकडे माझी आई मतदानाला माझ्यासोबत आल्याचे सांगत ती माझ्याच बाजूने असल्याचा संदेशही अजितदादांनी दिला. अजित दादांनी हे वक्तव्य करुन एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा रंगली.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज (मंगळवार) आज मतदान होत आहे. महायूतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या नणंद – भावजय मध्ये लढत होत आहे. तर शरद पवार विरुद्ध अजित पवार असे चित्र या लढतीचे झाले आहे. दोघांच्याही अस्तित्वाची लढाई असल्याच्या दृष्टिकोनातून या लढतीकडे पहिले जात आहे.
या प्राशवभूमीवर प्रचारादरम्यान, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले गेले. पवार घराण्यातील सर्वजण शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे राहिल्याने अजित पवार काहीसे एकाकी पडल्याचे चित्र होते. अगदी अजित पवार यांची आईही त्यांच्या निर्णयावर नाखूश असल्याचे सांगण्यात आले होते. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. तेव्हा श्रीनिवास पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते. पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी म्हटले. माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले. या संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली आहे, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले होते.या पार्श्वभूमीवर अजित पवार हे आई आशाताई पवार यांनाच बरोबर घेऊनच मतदान करण्यासाठी आले आणि आज माझी आई माझ्यासोबत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी तर आमच्या घरात माझी आई आशाताई अनंतराव पवार सर्वात ज्येष्ठ आहेत असे वक्तव्य करत त्यांनी शरद पवार आणि त्यांचे बंधु श्रीनिवास पवार आणि इतर कुटुंबीयांना टोला लगावला.
अजित पवार हे जेव्हा मतदानाला आले तेव्हा त्यांची आई आशाताई अनंतराव पवार या त्यांच्यासोबत होत्या. या दोघांनीही मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, ही भावकीची आणि गावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी तसेच पुढील पाच वर्षांचा विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा, याची आठवण अजित पवारांनी पुन्हा एकदा करुन दिली.