पुणे(प्रतिनिधि)–राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जून पासून राज्यातील सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार असे जाहीर केले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिर चौकात आंदोलन करण्यात आले.
जगताप म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ९ फेब्रुवारी रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भर सभेत घोषणा केली की “दिनांक १ जून २०२४ पासून राज्यातील सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार”. राज्यातील तमाम जनतेने ही घोषणा ऐकली, भाजपच्या सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी, आयटी सेलने सोशल मीडियावर स्वतःच्या पक्षाचे आभारही मानले. त्यानंतर लोकसभा निवडणूक आली, या निवडणुकीतही भाजपने मुलींना मोफत शिक्षण देणार म्हणून गावोगावी प्रचार केला. मात्र निवडणूक संपताच भाजपला स्वतःच्या घोषणेचा विसर पडला.
१ जून पासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू झाले, विद्यार्थिनींच्या मागे पैशांचा तगादा लागला. सरकारवर विश्वास ठेवून मोफत शिक्षण घेऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थिनी पैशांच्या विवंचनेने त्रस्त असताना सत्ताधारी पक्ष मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे. सरकारच्या या स्वार्थी धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.”