पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील एफसी रस्त्यावरील असलेल्या ‘एल-३ द लिझर लाउंज’ या पबमधील ड्रग्ज प्रकरणावरुन आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पब आणि बार मालकांचे पोलिसांसोबत आर्थिक हितसंबंध आहेत, असा आरोप काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केला आहे. तर धंगेकरांनी यापूर्वी अनेक बार मालकांचे आणि हप्त्यांचे कागद दाखवले होते, त्याचं पुढे काय झाल? एक प्रकरण धरतात सोडून देतात दुसरे धरतात सोडून देतात, त्या कागदांचे काय झाले? ते आधी सांगा असे म्हणत भाजप नेत्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी धंगेकराना जाब विचारला आहे.
आम्ही एखादा मुद्दा उपस्थित करतो आणि शेवटपर्यंत नेतो मध्येच सोडत नाही, असा टोला धंगेकरांना मेधा कुलकर्णींनी लगावला आहे. पुण्याची प्रतिमा मलिन होऊ देणार नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करणार आहे. पुण्यातील ड्रग प्रकरणावर पुणे पोलीस धडधड कारवाई करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असेही मेधा कुलकर्णी म्हणाल्या.
तरुणांना बरबाद करण्याचे काम सुरू : रविंद्र धंगेकर
रविंद्र धंगेकर म्हणाले, गेले वर्षभर मी सातत्याने पब, अंमली पदर्थ, हुक्का पार्लवर वर्षभर बोलत आहे. पण पोलिसांना मात्र जाग येत नाही. प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे. सहा- सहा महिन्यांनी नाव काढण्यापेक्षा एकदाच सगळी नावे बाहेर काढा, सर्व हुक्का पार्लर सील करा. हुक्क पार्लर ही काय संस्कृती आहे? तरुणांना बरबाद करण्याचे काम सुरू आहे. सुरक्षीत पुणे, माझे पुणे ही माझी मागणी आहे. त्याचबरोबर रात्री उशीरापर्यंत पार्टी आयोजित करणाऱ्या अक्षय कामठेच्या मागे कोण आहे याचा शोध घ्या.
अंधारे– धंगेकरांची शंभूराज देसाईंवर जोरदार टीका
पुणे ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका करत गंभीर आरोप केला आहे. राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहोचतात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो, असा मोठा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. तसेच पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर आम्ही तब्बल आठ ते नऊ महिन्यापासून सातत्याने भूमिका मांडत आहोत. जेव्हा कोट्यवधींचे ड्रग्जचे साठे सापडले होते. तेव्हाही आम्ही शंभुराजे देसाई आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारले होते. शंभूराज देसाई यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. शंभूराज देसाई यांच्यासाठी काम करणारे उत्पादन शुल्कचे अधिकारी राजपूत यांचेही निलंबन झाले पाहिजे. हे झाल्याशिवाय पुणे सुधारणार नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.