#सावधान: पुण्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता, पॉझिटिव्हीटी दर तिप्पट


पुणे-पुण्यात मागील आठवडय़ात असणारा कोरोनाचा 4.6 टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता 12.5 टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. संसर्ग वाढत असला, तरी तो नियंत्रणात असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत. शिवाय पुणेकरांनी काळजी न करता, काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी बुधवारी केले. दरम्यान, पुण्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता A second wave of corona is likely in Pune असून, ही हलकी सुरुवात असल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांकडून सांगण्यात आले.

कोरोना आढावा बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणेकरांची चिंता वाढली: दिवसभरात पुणे शहरात तब्बल 743 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

मोहोळ म्हणाले, कोरोनाबाधित उपचार सुरू असणाऱया रुग्णांची कमी होणारी संख्या गेल्या दहा-बारा दिवसांपासून वाढू लागली आहे. सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसरात संसर्ग वाढताना दिसत आहे. याभागात संसर्ग वाढला, तर पुन्हा कंटेन्मेंट झोन सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. सध्या शहरात 17 स्वॅब सेंटर सुरू आहेत. दिवसाला 3000-3500 हजार स्वॅब टेस्ट केल्या जात आहेत. चार वॉर्ड ऑफिस परिसरात नव्याने स्वॅब कलेक्शन सेंटर वाढविण्यावर निर्णय घेण्यात आला आहे.

लग्न समारंभातील संख्येवर निर्बंधाचा विचार

सध्या कोणतेही निर्बंध नव्याने लागू करण्याचा महापालिकेचा विचार नसला, तरी मोठी खबरदारी घेत आहोत. मास्क न वापरणाऱया नागरिकांवर कडक कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे. तसेच लग्न समारंभाच्या नागरिकांच्या संख्येवरील निर्बंधाचे बंधन कठोर करण्याचा विचार केला जात आहे, असेही मोहोळ यांनी नमूद केले.

अधिक वाचा  लस मोफत पण, एक मे पासून लसीकरण नाही

बाधितांची दैनंदिन संख्या 300 वर

कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता असून, बाधितांची संख्या वाढत आहे. ही हलकी सुरुवात आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवडय़ापासून बाधितांची शंभर-दीडशेपर्यंत आलेली संख्या आता साडेतीनशेपर्यंत गेली आहे. लॉकडाऊन अद्यापही आहे. अजूनही सुरक्षिततेचे सगळे नियम पाळायचे आहेत, याचे भानच नागरिकांना राहिलेले नाही. लॉकडाऊन संपला नसून, तो शिथिल करण्यात आला आहे, याची जाणीव नागरिकांना होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love