पुणे- कोरोनाने देशात थैमान घातले आहे. महराष्ट्रात पुण्यामध्ये कोविड-१९ चा सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे. सरकार, प्रशासन सामाजिक संस्था आपापल्या पातळीवर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारांबरोबरच रक्ताचीही अत्यंत गरज आहे. हे लक्षात घेऊन सामाजिक भान जपत गणेशोत्सवामधील एक उपक्रम म्हणून पुण्यातील वडगाव धायरी भागातील ‘पार्क व्ह्यू’ सोसायटीतील नागरिकांनी रक्तदान करीत या कार्यात खारीचा वाटा उचलला आहे. कोणीही आवाहन केले नसताना आपले समाजाप्रती काहीतरी देणे लागते या भावनेतून या सोसायटीच्या सदस्यांनी रक्तदान केले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहाय्याने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात 40 रक्त दात्यांनी रक्तदान केले. सोसायटीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टंस पासून सर्व नियमांचे पालन यावेळी करण्यात आले.
रक्तदान शिबिराबरोबरच गणेशोत्सवा दरम्यान सभासदांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. सोसायटीच्या कम्युनिटी हॉल मध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. परंतु, गर्दी होऊ नये महणून दररोज ‘फेसबुक लाइव्ह’ करून आरती केली जाते. याशिवाय सभासदांसाठी रांगोळी स्पर्धा, नृत्य, गायन,उखाणे, चित्रकला स्पर्धा, फॅमिली गेम्स असे विविध उपक्रम ऑनलाईन घेतले जातात.