प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा — डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती व इतर संघटनांची मागणी


पुणे : अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या घरी बसवलेल्या गणपतीच्या पाटाखाली भारतीय संविधानाची प्रत ठेवून संविधानाचा अवमान केला आहे. मनुवादी मानसिकतेतून प्रवीण तरडे यांनी केलेला हा प्रकार आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करावी व अशा प्रकारची कृती करण्यामागील मास्टरमाईंड शोधून काढावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती व इतर संघटनांनी केली. भारती विद्यापीठ पोलीस चौकीसमोर निषेध आंदोलन करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवीण तरडे यांनी माफी मागण्याची तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

रिपब्लिकन संघर्ष सेना, बहुजन समाज संघ, भारतीय मायनोरिटीज सुरक्षा महासंघ आदी संघटनांनी हे आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष महिला विजयाताई बेंगळे, डिंपल सोनवणे, आशा गायकवाड, सरोज वाल्मीकी, पूजा ताई, सुनील म्हस्के, बबन जवंजाळ, योगेश वरपे, शिवा पाटोळे, आदेश सोनवणे, कार्तिक लोणारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  टाटा स्कायने रीव्हॅम्प्ड म्युझिक सेवा- टाटा स्काय म्युझिक सादर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले,”प्रवीण तरडे यांच्यामुळे कृतीमुळे गणेशोत्सवाला गालबोट लागले आहे. पुस्तक बाप्पा ही संकल्पना साकारताना प्रवीण तरडे यांनी जाणून-बुजून संविधानाची प्रत गणेश मूर्तीच्या खाली ठेवली. त्यातून संविधानाचा अवमान झाल्याची भावना आमच्या मनामध्ये आहे. ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सदर प्रकाराबद्दल माफी मागितली. मात्र माफी मागताना मिशांवर पीळ देत उन्मत्तपणा दाखवला. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते नाराज झाले आहेत. तरी प्रवीण तरडे यांनी जाहीर माफी मागावी. तसेच आपली मिशा काढून टाकावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.

“यासह उपनगरांमध्ये बिल्डरांचा सुळसुळाट आणि गैरधंदे करण्याचे प्रकार वाढले आहेत. राजेंद्र उर्फ नाना आंबेकर यांनी एकच फ्लॅट अनेक लोकांना विकत फसवणूक केली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला हवी. बाळू जगताप यांचा गुजरवाडी येथे रंग कारखाना असून ते मागासवर्गीय लोकांच्या गाड्यांना लक्ष करून त्यांना त्रास देत आहेत. या प्रकाराचीही पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. अन्यथा पुढील काळात संघटनांच्या वतीने उग्र आंदोलन केले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love