पुणे- माओवाद्यांच्या बंदुकीतून लढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, वैचारिक माओवादी (Maoists) आमच्या शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत. त्याविरूद्ध केवळ विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नव्हे तर जो राष्ट्र प्रथम (nation first) माननाऱ्या सर्वांनी संघटित व्हायला हवे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis ) यांनी केले. विश्वगुरू (Vishwaguru) बनवायचे असेल तर समाज आणि राष्ट्राचा विचार करणाऱ्या तरुणांनी आघाडीतून नेतृत्व करायला हवे असेही ते म्हणाले.
पुणे शहरात होत असलेल्या अभाविपच्या (abvp) राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीच्या अंतर्गत आज शुक्रवार दि २६ मे ला नागरी स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी सेनाध्यक्ष जनरल मनोज नरवणे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात अभाविप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही, राष्ट्रीय महामंत्री श्याज्ञवल्क्य शुक्ल, नागरी स्वागत समारोहाच्या स्वागत समिती चे अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी, स्वागत समिती सचिव बागेश्री मंठाळकर, अभाविप च्या राष्ट्रीय मंत्री कु. अंकिता पवार, पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते व प्रदेश मंत्री श्री. अनिल ठोंबरे मंचावर उपस्थित होते. यावेळी, पुण्यातील प्रतिष्ठित मान्यवर देखील कार्यक्रमात सहभागी झाले होते.
फडणवीस म्हणाले की, “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही आपल्या विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारी संघटना आहे. अभाविपच्या काश्मीर आंदोलनाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. जीवनात संघर्ष आणि दृढते सोबतच आंदोलन मी अभाविप मध्ये शिकलो. माझ्यात नेतृत्वगुणांचा विकास अभाविप मुळे झाला. अभाविप हा एक असा मंच आहे, ज्यात अतिसामान्य तरुण अभाविप च्या कार्यपद्धती द्वारा सामुहिकता शिकतो, त्याच्यात नेतृत्वगुणांचा विकास होतो, तो सामर्थ्यवान बनतो. स्वातंत्र्यानंतर मॅकोल्याची मानसिकता असणाऱ्यांनी भारताचा सुवर्ण इतिहास दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला भारताच्या खऱ्या इतिहासापासून दूर ठेवण्यात आले. विज्ञानाने सांगितले आहे की भारताची सभ्यता सर्वात जुनी आहे. आपण आपला खरा इतिहास जगासमोर आणायला हवा, जो आपल्याला तेजस्विता देईल, याची सुरुवातही झाली आहे. आज आपण ज्या शाश्वततेबद्दल बोलतो ती भारतीय संस्कृती मध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, आणि या शाश्वततेने भारतीय सभ्यता जिवंत ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. भारतात एक विचारधारा आहे जी तरुणांच्या मानसिकतेत विषाणू सोडण्याचे काम करत आहे. माओवाद्यांच्या बंदुकीतून लढण्याचे प्रमाण कमी झाले आहे परंतु वैचारिक माओवादी आमच्या शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत. त्याविरूद्ध आपण संघटित व्हायला हवे. भारताला विश्वगुरू बनवायचे असेल तर समाज आणि राष्ट्राचा विचार करणाऱ्या तरुणांनी आघाडीतून नेतृत्व करायला हवे.
जनरल मनोज नरवणे म्हणाले की, “आपण एकमेकांच्या वैशिष्ट्यांचा आदर करायला हवा. विविधते मध्ये एकतेचा नारा हा विविधतेमध्ये शक्ती चा नारा बनला पाहिजे. ज्यावेळी आपण विविधतेला आपली शक्ती मानू त्यावेळी आपण अधिकाधिक प्रगती करू. मी विनंती करतो की, प्रत्येकाने आपली मातृभाषा, राज्य भाषा, तसेच आंतरराष्ट्रीय भाषा या बरोबरच अजून एक भाषा शिकायला हवी. दूसरी भाषा शिकल्याने विविधतेमध्ये शक्ती ला बळ मिळेल. भारताची अर्थव्यवस्था चांगली प्रगती करत आहे. सध्याची आपली युवा शक्ती आर्थिक विकासात फायदा मिळवून देऊ शकते. ही तरुण लोकसंख्या शिस्त आणि कौशल्याने सुसज्ज असेल तरच त्याचा फायदा होईल, त्यामुळे सध्या भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी, अभाविप महत्वपूर्ण प्रयत्न करत आहे.”
अभाविप राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले की, पुणे प्राचीन संस्कृती सोबतच विविध महत्वपूर्ण विषयांच्या गाथा समावून आहे. पुणे भारताच्या विकासात आपली महत्वपूर्ण भूमिकेची जबाबदारी सांभाळत आहे. स्वातंत्र्यानंतर जे संकल्प अपूर्ण राहिले त्या संकल्पांना पूर्ण करणाऱ्या शक्तीचे नाव विद्यार्थी परिषद आहे. अभाविप युवकांचा वास्तविक आवाज आहे. अभाविप च्या कार्यकर्त्यांनी आपल्या विविध कार्यांतून समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. विविध क्षेत्रांत युवकांनी समाजाच्या विविध समस्यांच्या उपायासाठी प्रेरणादायी कार्य केले आहे.