एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही : अजित पवारांनी सुनावले


पुणे–पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांचे निधन होऊन दोन दिवस उलटत नाही तोच त्यांच्या जागेवर कोण खासदार होणार यावर भाजप आणि विरोधी पक्षाकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी,(ajit pawar) “आपल्यात जरा माणुसकी राहू द्या,एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही” अशा शब्दांत सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोघांनाही सुनावले आहे.

गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत कुणाला संधी मिळणार? कोण खासदार होणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मविआ पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूक लढवणार, असं जाहीर केलं. त्यापाठोपाठ पुण्यात भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे ‘भावी खासदार’ म्हणून बॅनर झळकले. शिवाय, भाजपाकडून गिरीश बापट यांच्याच कुटुंबात उमेदवारी दिली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. यासंदर्भात शुक्रवारी अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. आज त्यांनी  दोन्ही बाजूच्या नेत्यांना सुनावले.

अधिक वाचा  आम्ही सावित्री - फातीमेच्या लेकी, काय आम्हा कुणाची भीती : हिजाब बंदीचा वाद- कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

अजित पवार म्हणाले, “मी कालही बापटांचे चिरंजीव, सूनबाई, कन्येला भेटायला गेलो तेव्हा याबाबत बोललो. कालपर्यंत त्यांच्या अस्थींचंही विसर्जन झालेलं नव्हतं. आपल्यात जरा माणुसकी राहू द्या. एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही. याबाबत साधारण आपल्याकडे पद्धत आहे की १३-१४ दिवस आपण दुखवटा पाळतो. सगळ्यांनीच त्याचं तारतम्य पाळलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या लोकांनीही ते ठेवलं पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीही ते ठेवावं अशी अपेक्षा आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी दोन्हीकडच्या नेत्यांना सुनावलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love