( Social media gave him a way to live: an interesting story of a village youth)
‘सोशल मिडीया’ हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अनेकवेळा सोशल मिडीयाचा वापर केवळ टाईमपास म्हणून तर कधी त्याचा गैरवापरही होताना दिसतो. परंतु, या माध्यमाचा वापर सकारात्मक दृष्टीने आणि एक व्यासपीठ म्हणून केला तर त्यातून रोजगार निर्मितीही कशी होऊ शकते याची काही मोजकी उदाहरणे आत्तापर्यंत समोर आली आहेत. असेच एक उदाहरण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेणी या छोट्या गावामध्ये घडले आहे. ‘सोशल मिडीया’चा वापर केवळ टाईमपास किंवा टीका टिप्पणी करण्यासाठी करतात अशा तरुणांना प्रेरणा देणारे हे उदाहरण आहे. वेणी गावातील एक २२ वर्षीय तरुण महेश कापसे लॉकडाऊनच्या काळात आपल्या कलेचा वापर करून बोटांच्या सहाय्याने आणि केवळ काळ्या रंगाचा आणि पेपरचा वापर करून काढलेल्या ‘पोट्रेट’चा व्हिडीओ अगदी सहज ‘टिकटॉक’वर टाकतो काय, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो काय, त्याची दखल ‘टिकटॉक’ घेते काय आणि त्यातून त्याला रोजगाराचा मार्ग मिळतो काय अशी ही थक्क करणारी कहाणी महेशच्या बाबतीत घडली आहे.
याबाबत महेश कापसे याने स्वत: सांगितलेली कहाणी अतिशय रंजक आहे. महेश याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची. आई-वडील, भाऊ,आजी असे कुटुंब असलेल्या या युवकाने १२ वी नंतर लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्याने औरंगाबादमध्ये येथे ‘आर्ट डिप्लोमा’ पूर्ण केला आणि औरंगाबादमध्येच एका शाळेत आर्ट टीचर महणून नोकरीही करू लागला. नोकरीला जेमतेम एक वर्ष पूर्ण होत नाही तोच कोरोनाचे संकट सुरु झाले आणि लॉकडाऊन झाल्याने महेश आपल्या वेणी या गावी गेला. सुरुवातीला दिवस कसा घालवायचा हा प्रश्न होताच. मग तो ‘टिकटॉक’वरचे व्हिडीओ पाहात दिवस घालवायचा. सहज कल्पना सुचली म्हणून त्याच्या कलेचा वापर करून श्रीकृष्णाच्या पोट्रेटचा व्हिडीओ त्याने ‘टिकटॉक’वर पोस्ट केला आणि त्याला चांगले लाईक्स आणि फॉलोअर्स मिळाले. सुमारे ५०० के लाईक्स आणि २० के फॉलोअर्स त्याला त्यावेळी मिळाले. मग त्याने महादेवाच्या पोट्रेटचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्याला तर प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या व्हिडीओला २ मिलियन लाईक्स आणि फॉलोअर्स मिळाले. हा प्रतिसाद बघून ‘टिकटॉक’ने त्यांच्या आयडीवरून हा व्हिडीओ बूस्ट केला. हा व्हिडिओ समीक्षा सुध यांनी पाहिला त्यांना महेशची कला भावली आणि त्यांनी तो व्हिडीओ त्यांच्या आयडीवर पोस्ट केला. त्यामुळे हा व्हिडीओ सुमारे २६ मिलियन लोकांनी पाहिला आणि तेथून पुढे महेशच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली असे तो सांगतो.
हा प्रतिसाद पाहून महेशला यातून चांगले काहीतरी होऊ शकते असा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर समीक्षा सुध यांच्याप्रमाणे ‘टिकटॉक’वर प्रसिध्द असलेल्या व्यक्तींबरोबर ‘ड्युट करायला’ सुरुवात केली. म्हणजे या प्रसिध्द व्यक्तींचे पोट्रेट तयार करून त्याचे व्हिडीओ तयार केले आणि पोस्ट केले. ते व्हिडीओ बघून लोक ‘मेन्शन’ करायचे त्यामुळे महेशच्या आयडीचा मेसेज या प्रसिद्ध व्यक्तीना जायचा आणि मग ते बघायचे एवढे लोक आपल्याला ‘मेन्शन’ करता म्हटल्यावर तेही या व्हिडीओत काय आहे ते बघायचे. त्यांना व्हिडीओ आवडला की ते त्यांच्या आयडीवर तो व्हिडिओ पोस्ट करायचे. तसच पुढे महेश करत गेला. त्याने अभिनेता रितेश देशमुख डेव्हिड वॉरेन, भारती सिंग, यांच्या सारख्या प्रसिध्द व्यक्तींचे पोर्ट्रेट बनवले. ते त्यांनी त्यांच्या आयडीवर पोस्ट केले आणि तिथून पुढे महेशने मागे वळून पहिले नाही. त्याचे १ मिलियन फॉलोअर्स झाले. याची दाखल खुद्द ‘टिकटॉक’ने घेतली. त्यांनी महेशशी संपर्क साधून त्याला ‘पॉप्युलर टॅग’ (popular Tag)दिला आणि आयफोन-११, व्हिडीओ शुटींगसाठी लागणारे सर्व साहित्य त्याला भेट म्हणून दिले.
‘टिकटॉक’ने पॉप्युलर टॅग’ दिल्यानंतर महेशचे आणखी लोक त्याला फॉलो करायला लागले. त्यानंतर १.३ मिलियन फॉलोअर्स त्याचे झाले. त्यानंतर भारतात ‘टिकटॉक’वर बंदी आली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर त्याने व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली. ते व्हिडीओ पाहून त्याला झी टीव्हीवरील ‘लाव रे तो व्हिडिओ’ या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले. त्यामध्ये तो ‘विनर’ आला होता. आता सध्या महेश इन्स्टाग्रामवर अनेक कलाकारांच्या पोर्ट्रेटचे व्हिडीओ करून पोस्ट करतो आहे. हे कलाकारही ते व्हिडीओ त्यांच्या आयडीवर पोस्ट करीत आहे. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, संस्कृती बालगुडे अशा कलाकारांच्या पोर्ट्रेटचे व्हिडिओ त्याने बनवले आहेत. त्यांनीही ते व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
परंतु, ‘टिकटॉक’च्या व्यासपीठावरून महेशची कला काही मिलियन पर्यंत पोहचल्याने त्याला पोर्ट्रेट बनविण्याच्या ऑर्डर फोनवर येत आहेत. महिन्याला त्याला १५ ते २० पोर्ट्रेटच्या ऑर्डर त्याला येत आहे. परंतु, ‘टिकटॉक’ सुरु असताना ज्या प्रमाणात ऑर्डर मिळत होत्या त्याचे प्रमाण कमी झाल्याची खंत महेश व्यक्त करतो.
युवकांनी केवळ व्हिडीओ पाहण्यामध्ये आपला वेळ न घालता आपणही काहीतरी क्रिएटिव्ह करून आपले व्हिडिओ तयार करावेत आणि त्यातून उत्पन्न कसे मिळवता येईल यादृष्टीने या माध्यमाचा उपयोग करावा असे आवाहन तो करतो. आता भारतात सुरु झालेल्या MX टकाटक वर आपले व्हिडीओ पोस्ट करतो. MX टकाटकनेही महेशला ‘पॉप्युलर टॅग’ दिला आहे.