पुणे- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभरातील अनेक राज्यांमध्ये कारवाई केली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी नियोजित आंदोलनाच्याआधीच ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घोषणाबाजीचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात केले जात आहेत. दरम्यान, हा प्रकार अत्यंत निंदनीय असून अशा प्रकारच्या देश विघातक वृत्तींना वेळीच ठेचून काढले पाहिजे. या प्रकरणातील सर्व दोषींवर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपचे संगमनेरचे माजी नगरसेवक व नेते ज्ञानेश्वर कर्पे यांनी केली आहे.
पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयविरोधात एनआयएने केलेल्या कारवाईविरोधातील आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलीस काही कार्यकर्त्यांना गाडीमध्ये बसवून घेऊन जात असतानाच रस्त्यावर जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या नावाने घोषणाबाजी केली. आंदोलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली.
यंत्रणांच्या तपासात जे निष्पन्न होईल ही होईल. परंतु, कारवाई करताना अशा प्रकारे देशाचा दुश्मन असलेल्या देशाचा जयजयकार करणे म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे. यामुळे कायदा सुव्यवस्था आणि जातीय तेढ निर्माण करणे हा उद्देश या आंदोलकांचा असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कर्पे यांनी केली आहे.