पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; व्हिडिओ व्हायरल

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–पुण्यात दहशदवाद विरोधी पाठक (एटीएस) आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) काही कार्यकर्त्यांना अटक केली होती. या विरोधात पुण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल ६० ते ७० कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतल्यानंतर काही आंदोलनकर्त्यानी यावेळी “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत झाल्यानंतर या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे, संबधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नेटकरी करीत आहेत. दरम्यान, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मात्र, हे आरोप नाकारले आहेत. त्याचप्रमाणे ‘पीएफआय’च्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या नसल्याचे पुण्याचे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी म्हटले आहे. बेकायदेशीरपणे जमावाविरुद्ध ‘पीएफआय’वर मात्र गुन्हा दाखल दाखल झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

देशाविरोधात आणि समाज विघातक कारवाया केल्याच्या संशयावरून देशातील १२ राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी आणि एटीएस यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक कार्यालयांवर छापे टाकले होते. या कारवाईत 100 पेक्षा अधिक पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय २६, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द, पुणे) यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी एनआयएने महाराष्ट्रासह तेलंगाणा, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह इतर राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित अनेक ठिकाणांवर मोठी कारवाई केली होती. आसाममध्ये पीएफआयशी संबंधित ९ जणांना ताब्यात घेतलं. तर तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातही एनआयएने या महिन्याच्या सुरवातीला जवळपास ४० ठिकाणी छापे टाकले होते.

पोलिसांनी आरोप फेटाळले

पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा- ए – तकबीर, अल्लाह – हू – अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप आमदार नीतेश राणे आणि राम सातपुते यांनी ट्विट करत हा आरोप केला. मात्र, पुणे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

भाजपचे आमदार राम सातपुते यांनी याप्रकरणी एक व्हिडिओ ट्विट करत थेट आरोप केले आहेत. ते म्हणाले, पुण्यात ‘पीएफआय’च्या देशद्रोही लोकांच्या अटकेनंतर निघालेल्या मोर्चात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पिलावळीला पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करावेत. देशद्रोही जिहादी प्रवृत्तीची गय करता कामा नये. कठोर कारवाई करावी.

भाजप आमदार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नीतेश राणे यांनी देखील ट्विट करत तसेच व्हिडीओ जारी करत आरोप केले आहेत. राणे म्हणाले, ‘पीएफआय’च्या समर्थनार्थ काही नालायकांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले. हे लोक विसरले असतील की आता राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. देशाच्या विरोधी कोणीही अशाप्रकारचे नारे देत असतील तर अशा पद्धतीच्या देशद्रोह्यांना शिक्षा झालीच पाहिजे, हे पोलिस खात्याने लक्षात ठेवावे. या लोकांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा द्यावी. अशाप्रकारची हिम्मत पुन्हा कोणाकडून होता कामा नये. असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मात्र, हे आरोप नाकारले आहेत. त्याचप्रमाणे ‘पीएफआय’च्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या नसल्याचे पुण्याचे डीसीपी सागर पाटील यांनी म्हटले आहे. बेकायदेशीरपणे जमावाविरुद्ध ‘पीएफआय’वर मात्र गुन्हा दाखल दाखल झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *