पुणे— मला आणि माझ्या बहिणीला महाराष्ट्रात अजून कुठे मतदार संघ मिळतोय का ते बघतो. कारण आता आम्ही तिथे हरणार म्हटल्यावर तिथे थांबून कसं चालेल? मी त्यांनाच विचारणार आहे, की असा कोणता मतदार संघ ठेवणार आहे का ? जिथे आम्ही निवडून येऊ शकतो, असा उपरोधिक टोला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे.
बावनकुळे बारामती दौऱ्यावर असताना बावनकुळे यांनी बारामतीचा गड आम्ही नक्कीच जिंकू, असे विधान केलं होतं. अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी बावनकुळे यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला. पुणे जिल्ह्यातील लोणीकंद येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, बावनकुळे नुसत्या गप्पा मारायचं काम करतात. ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही. पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते. ही यांची विश्वासहर्ता यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्या मी खंबीर आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
देशद्रोही, समजाकंटक यांचा कोणीही विचार करु नये
दरम्यान, अजित पवार यांना मुंबई बॉम्ब बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणाबाबत विचारलं असता, ते म्हणाले की ज्या व्यक्ती चांगल्या असतात, त्यांच्या बाबत चांगल्या गोष्टी घडाव्यात. मात्र, देशद्रोही, समजाकंटक यांचा कोणीही विचार करु नये, चांगल्या गोष्टी बोलण्याचाही प्रयत्न करु नये असं माझं स्पष्ट मत आहे. त्यावेळी जर तसं झालं असेल तर कोणीतरी लक्षात आणून द्यायला हवं होतं. मला तर आत्ता तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा माहिती मिळाली. मी यासंबंधी माहिती घेईन अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीभोवती टाइल्स आणि एलईडी लाइट्स लावण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि कारवाई करण्यात आली. पण यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात हे सुशोभीकरण झाल्याने भाजपा नेते टीका करत आहेत. भाजपा नेते राम कदम यांनी याकुब मेमनच्या कबरीचे फोटो ट्वीट करत उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी माफी मागावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
या मुद्द्यावरून भाजपा नेत्यांकडून होणाऱ्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले “‘लक्ष्य करण्याशिवाय यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत. यांना महागाई, बेरोजगारीसंबंधी बोलता येत नाही. शेतकरी हवालदिल झाला असून रोज आत्महत्या करत आहे. त्याला ताठ मानेने उभं करण्यासाठी मदत करत नाही. आणि लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ही निती आहे. त्यामुळे या गोष्टीला महत्त्व देण्याचं कारण नाही.
नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसवर जाऊन घेतले गणरायाचे दर्शन
अजित पवार यांनीही आज सकाळी साडेसातच्या सुमारास जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पुण्यातील डोणजे येथील फार्म हाऊसवर जाऊन गणरायांचे दसरक्षण घेतले आणि नाना पाटेकर यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसवर जाऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. त्या ठिकाणी नानांनी स्वतः तयार केलेल्या पिठले – भाकरीचा आस्वाद त्यांनी घेतला. शिंदे आणि नाना यांच्यातील भेटीने वेगवेगळे तर्कवितर्क करण्यात येत असताना, अजित पवार यांनीही नानांची भेट घेऊन सुमारे दोन तास चर्चा केली. यावेळी त्यांनी फार्म हाऊसवर फेरफटका मारून तेथील शेती, फळबागा, जनावरांचा गोठा याबाबतची माहिती घेतली.