पुणे-शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले मंत्री आणि आमदार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. आज(मंगळवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे एकाच दिवशी पुणे दौऱ्यावर होते. तर माजी मंत्री व बंडखोर आमदार उदय सामंत हे शिंदे यांच्याबरोबर होते. आदित्य ठाकरे कोण,असा सवाल करणाऱ्या उदय सामंतांची गाडी शिवसैनिकांच्या कचाट्यात सापडली आणि गाडीवर आक्रमक शिवसैनिकांनी हल्ला केला.यामध्ये उदय सामंतांची गाडीही फोडण्यात आलेली आहे. तसेच गद्दार- गद्दार अशा घोषणाही शिवसैनिकांनी दिल्या.
उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे कोण, असा सवाल केल्याने शिवसैनिक आधीच खवळले होते. सामंत यांचा ताफा पाहिल्यानन्तर ते अधिकच संतप्त झाले. या प्रचंड गर्दीस आवरणे पोलिसांनाही कठीण जात होते. संतप्त शिवसैनिकांनी चपला, बाटल्यासह सामंत यांच्या कारवर दगडांचा मारा केला. यात सामंत यांचा सहकारी जखमी झाल्याचे समजते. यावरून शिंदे गट विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसैनिकांची आज मोठी गर्दी केली होती. त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज पुण्यात होते. सामंत हे आज दिवसभर शिंदे यांच्यासोबत होते. शिंदे हे भोजनासाठी कात्रज चौकात असलेल्या तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. सामंत हे देखील त्यांच्यासोबत होते. तेथून ते मुंबईकडे जात असतानाच आदित्य यांची सभा संपवून निघालेल्या शिवसैनिकांच्या कचाट्यात सामंत यांची गाडी सापडली.काहीनी त्यांना ‘गद्दार’ संबोधले. तर काहीनी थेट उदय सामंत यांच्या गाडीवर दगड भिरकावले. यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. यात त्याच्या गाडीतील काही जखमी झाले. पोलिसांनी तातडीने दाखल घेत उदय सामंत यांच्या ताफ्याला वाट करून दिली.