पुणे : कलाश्री संगीत मंडळ आणि औंध सोशल फाउंडेशन यांच्यावतीने येत्या 14, 15 आणि 16 जून रोजी भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक औंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत गायकवाड, कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कलाश्री संगीत मंडळाचे मिलिंद कांबळे, सचिदानंद कुलकर्णी, अरविंद पाटील, शिरीष नाईक आदी उपस्थित होते.
महोत्सवाचे हे 11 वे वर्ष असून, हा महोत्सव भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर औंध येथे संपन्न होईल. या महोत्सवाची सुरुवात 14 जून रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. त्यानंतर मोहिनी या भारतीय संगीत वृंदातील कलाकार रुचिरा केदार (गायन), साहाना बॅनर्जी (सतार), सावनी तळवलकर (तबला), अनुजा बोरुडे (पखवाज), अदिती गरडे (हार्मोनियम) आपली कला सादर करतील. गायक भुवनेश कोमकली यांच्या गायनाने पहिल्या दिवसाची सांगता होईल.
15 जून रोजी सायंकाळी ५ वाजता गायिका शाश्वती चव्हाण यांचे शास्त्रीय गायन होईल, तसेच अक्रम खान यांचे तबला सोलो आणि देवकी पंडित यांचे शास्त्रीय गायन होईल. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी 16 जून रोजी सायंकाळी ५ वाजता गायक अर्षद अली खान यांचे शास्त्रीय गायन होईल. शर्वरी जमेनीस यांच्या कथक नृत्याने महोत्सवाची सांगता होईल.
महोत्सवात हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर, मनोज देसाई, गंगाधर शिंदे, अभिनय रवंदे, निलय साळवी, तबल्यावर प्रशांत पांडव, पांडुरंग पवार, निखिल फाटक, रोहित मुजुमदार; तर पखवाजवर गंभीर महाराज संगीत साथ करतील. निवेदन आकाश थिटे करतील.
दरम्यान, यंदाचा भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार अमेरिकास्थित पं. सतीश तारे यांना प्रदान करण्यात येणार आहे.या महोत्सवाचा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहनही अभिजीत गायकवाड आणि पं. सुधाकर चव्हाण यांनी केले.