पुणे— नवाब मालिक सातत्याने खरं बोलत होते. समीर वानखडे प्रकरणात नवाब मलिकांनी अनेक भाजपच्या नेत्यांची नावे घेतली. यामुळेही त्यांना ईडीची नोटीस आली आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. सातत्याने आम्हाला धमकी दिली जात आहे, त्यामुळे मला त्याचं आश्चर्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
सुळे म्हणाल्या, मला कोणत्याही प्रकारची चिंता वाटत नाही. नवाब मलिक महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री आहेत. दुसरे त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस त्यांना माझ्या माहितीप्रमाणे देण्यात आली नव्हती. माझे नवाबांशी बोलणं झालेलं नाही. पण, मला जी माहिती मिळतेय त्यांनुसार त्यांच्या घरी जाऊन हे पथक धडकले असे त्या म्हणाल्या.
कदाचित भाजपच ईडी चालवत असेल. भाजपचे आणि ईडीचे अध्यक्ष एक असतील. किंवा भाजपने स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असेल,असे असू शकते. माझा ईडीचा काही अभ्यास नाही. जाणीवपूर्वक ठरवून या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप सुळे यांनी केला.
ट्विटर या माध्यमाचा खूप चांगला उपयोग भाजपचे लोकं या धमक्यांसाठी करत आहेत. हे निदर्शनास आले आहे.अशी टीकाही सुळे यांनी केली. कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक काही ट्विट करत असतात. असे म्हणण्यापेक्षा ट्विट करत याला अटक करणार आहेत , त्याला अटक करणार आहेत अशी धमकी देतात. गेले अनेक दिवस, अनेक महिने महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना ईडीची नोटीस आलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर देशात ज्या ज्या ठिकाणी सरकारच्या विरोधात बोललं जात आहे, त्या त्या ठिकाणी चौकशी, ईडीच्या नोटीस आल्या आहेत. याबाबत मी स्वतः संसदेत बोलले होते असेही त्यांनी नमूद केले.
दिशा सालीयन प्रकरणात राजकारण थांबवावे
दिशा सालीयन प्रकरणात भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने आरोप केले जात आहे. मात्र, दिशा सालीयन प्रकरणात राजकारण थांबवावे, असे सुळे म्हणाल्या.
मी देखील एक मुलगी असून, मला देखील एक मुलगी आहे. इतके एखादे असंवेदनशील राजकारण होऊ नये की त्याच्यात आपण आपल्या मुलींना घेऊन यावे. ज्याची मुलगी गेली आहे, ते जर असे म्हणतात की आमच्या मुलीबाबत बोलू नका तरीही जर कोणी याचं राजकारण करत असेल तर त्याचा जाहीर निषेध करते. असे घाणेरडं राजकारण कोणी जर करत असेल तर मी त्या आई वडिलांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी राहिल, असेही सुळे यांनी सांगितले.