Dhangekar killed time on the vision of Pune

अन् पुण्याच्या व्हिजनवर धंगेकरांनी वेळ मारून नेली

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)—पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धगेकर आणि वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाचे. या तीनही उमेदवारांनी त्यांच्या दृष्टिकोनातून “पुण्याचं व्हिजन” काय आहे यांची मांडणी केली. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे यांनी त्यांचे पुण्याच्या विकासाबद्दलच्या व्हीजनबद्दल सविस्तर मांडणी केली. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांचे ‘व्हीजन’ न सांगता केवळ सांगोपांग टीका करत वेळ मारून नेली.   

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तीनही उमेदवारांच्या एकत्रित वार्तालापाचे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी यावेळी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ त्यांचे व्हीजन सांगताना गेल्या दहा वर्षात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेली देश पातळीवरची कामे. आणि मोदी सरकारच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघात झालेली कामे याचा आढावा घेतला आणि खासदार झाल्यानंतर त्यांचे व्हीजन काय असणार आहे याबाबत सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, माझं पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर असावं, असा आमचा प्रयत्न असणार आहे. आधी केंद्रात राज्यात आणि पालिकेत एकच सत्ताधारी होते. त्यावेळी त्यांनी पुढच्या ५०  वर्षांचा विचार केला नाही, असं मला वाटतं. कागदावरची मेट्रो आम्ही सत्यात आणली. आधीच्या लोकांनी अनेक कामाची फक्त उद्घाटन केली, कामं केली नाहीत. आम्ही करून दाखवलं, असे ते म्हणाले.

वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. पीएमपीएल बसेस वाढवाव्या लागतील. शहरात मेट्रोचा विस्तार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. रिंग रोड पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. नदी प्रकल्प पूर्ण  करणे. पुरंदरचं विमानतळ करावं लागेल. नवी मुंबई आणि पुण्याच विमानतळ रेल्वे मार्गाने जोडण्याचा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ पुणे शहर करणं गरजेचं आहे. अनेक नॅशनल रिसर्च सेंटर आणणार आहे. आयआयटीचे सेंटर पुण्यात करता येतील का पाहणं, या गोष्टींचा पाठपुरावा करून आपण पूर्ण करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.  

वसंत मोरे म्हणाले, शहरातील वाहतूक कोंडी ही महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळे शहराच्या चारही बाजूला बस स्थानक होणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट करावी लागेल. पुण्यात पाणी प्रश्न गंभीर आहे. शहरात पाण्याचं नियोजन करणं गरजेचं  आहे. शहराला वेगळं धरण मिळणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाणी ,ट्रॅफिक, रस्ते यासाठी जाणकार लोकं बसवणं आवश्यक आहे. आपल्या नद्यांचं संवर्धन केलं पाहिजे.

रवींद्र धंगेकर यांनी मात्र, पुण्याच्या व्हीजन बद्दल न बोलता मोहोळ यांनी सांगितलेल्या कामांवर टीका टिप्पणी करत केवळ वेळ मारून नेली. त्यांना त्यांच्या व्हीजन बद्दल पत्रकारांनी विचारल्यानंतरही त्यांनी केवळ मोहोळ यांनी सांगितलेल्या पुणे शहरातील योजनांमध्ये कशा त्रुटी आहेत याबद्दलचा पाढा वाचला, मोहोळ यांनी त्याला आक्षेप घेत तुम्ही तुमचे व्हीजन सांगा वैयक्तिक टिक्का टिप्पणी करू नका असे सांगूनही धंगेकरांनी त्यांचे व्हीजन न सांगता केवळ वेळ मारून नेली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *