पुणे–सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नसल्याचे सांगत, जर अनेक स्तरातून सरकारच्या निर्णयाला विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी, त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही असे राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वीच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. विविध स्तरांतून सरकारच्या या निर्णयाचा विरोध सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर भाष्य केले आहे. कोरोनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात केल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे गोविंदबागेत पत्रकारांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले की, देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. नाशिक जिल्ह्यात देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे होते. १८ वाईनरी या जिल्ह्यामध्ये आहेत १८ वाईनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना वाईनरींच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळते. पण त्याला विरोध होत असेल, तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला, तरी वाईट वाटण्याचे कारण नसल्याचेही पवार यांनी म्हटले.
शरद पवार यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबतही आपले निरीक्षण सांगितले. दिल्लीच्या सीमेवर वर्षभर शेतकरी आंदोलनाला बसले होते. आंदोलनामुळे केंद्र सरकारने कायदे मागे घेतले. पण त्यांच्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. भाजप सरकारला याची किंमत मोजावी लागणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
निराशाजनक अर्थसंकल्प
मोदी सरकारचा हा सातवा अर्थ संकल्प होता. सर्वसामान्य लोकांची अपेक्षा होती की हे सरकार हळूहळू कर आखणी कमी करेल. नोकरी आणि व्यावसाय संदर्भात अपेक्षा जास्त होत्या पण बजेट पहिल्यानंतर निराशा आली आहे. देशात शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कष्ट केले साहजिकच शेतकऱ्यांच्या अपेक्षा असणार की अधिक गुंतवणूक करण्याची अपेक्षा होती. पण, त्याची पूर्तता झाली नाही शेती प्रश्नांवर लक्ष घालणारे जे घटक आहेत त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेतली तर त्यांची निराशा झाली आहे. काही लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा वायदा केला आहे. पण, गेल्या २ ते ३ वर्षात प्रती वर्षी इतक्या नोकऱ्या देऊ तितक्या नोकऱ्या देऊ असं सांगितले जाते पण त्याची पूर्तता होत नाही. पाठीमागचा अनुभव बघितला तर सरकारवर विश्वास ठेवण्यासासारखी परिस्थिती नाही. अर्थसंकल्प गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा असला पाहिजे, अधिक हाताला काम देणारं असलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला ज्या दैनंदिन जीवनात वस्तू लागतात त्याच्या किमती नियंत्रण ठेवून महागाईला आटोक्यात आणण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद असायला पाहिजे परंतु, याची पूर्तता अर्थसंकल्पात झालेली दिसत नाही, असं शरद पवार म्हणाले.