पुणे- राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेआहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर सर्व काही सुरळीत होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा अनेक गोष्टींवर निर्बंध आणले जात आहेत. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या आणि महाविद्यालयीन परीक्षा कक्षा घ्याव्यात याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता. अनेकांचा ऑनलाइन परीक्षेला विरोध तर काहींचा ऑफलाइन परीक्षेला विरोध आहे. त्यामुळे नक्की कुठला निर्णय घ्यावा हा सरकारपुढे प्रश्न होता. परंतु, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षांबाबत महत्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे या विभागाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा होईल असे वाटते आहे.
“राज्यात यंदा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी घेतल्या जाणार आहेत. यासंदर्भात संबंधित विद्यापीठांनी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठाकडून हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे दोन्ही पर्याय ऐच्छिक असल्यामुळे परीक्षा ऑनलाईन द्यायची की ऑफलाईन, याचा निर्णय आता विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे”, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच, ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना करोनासंदर्भातल्या नियमांचं पालन करूनच परीक्षा देता येईल, असेही ते म्हणाले.
इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या परीक्षा या १०० टक्के ऑनलाईन
दरम्यान, “इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यानुसार या परीक्षांचं नियोजन केलं जाईल”, असं उदय सामंत म्हणाले. त्यामुळे राज्यातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचा गोंधळ काहीसा कमी होण्यास मदत झाली आहे.