पुणे-मराठी भाषा दिवस हा एका दिवसासाठी मर्यादित न राहता सर्व दिवस तो साजरा व्हावा यासाठी विद्यापीठ कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळेच विद्यापीठात लवकरच मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास व विकास विषयक केंद्र उभारण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त ‘भाषा संगीताची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रा. डॉ. नितीन करमळकर बोलत होते. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम पार पडलेल्या या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. संजय चाकणे, मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ.संतोष परचुरे आदी उपस्थित होते. विद्यापीठ गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी गायिका शुभांगी नितीन मुळे यांनी ‘भाषा संगीताची’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी त्यांना सहकलाकार हेमंत वाळुंजकर यांनी गायनात साथ दिली तर हार्मोनियमवर जयंत साने, तबल्यावर मोहन पारसनीस यांनी साथ दिली. तसेच वादनसाहाय्य रोहन करंदीकर यांनी केले.
यावेळी विठ्ठला तू वेडा कुंभार, देव देव्हाऱ्यात नाही, कानडा राजा पंढरीचा, बाई मी विकत घेतला शाम आदी भक्तीगीते सादर केली. तसेच अनेक भावगीतेही यावेळी सादर करण्यात आली.
——-