पुणे -आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. नितीन करमळकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, सदाचार ही जीवनातील महत्वपूर्ण बाब आहे. सदाचारी व्यक्तीचा सदैव गौरव केला जातो, यासाठी सदाचारी बना. परकीय देशांच्या भाषेचे ज्ञान घेताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करु नका आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका.
आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. सदाचार ही जीवनातील महत्वपूर्ण बाब आहे. सदाचारी व्यक्तीचा सदैव गौरव केला जातो, यासाठी सदाचारी बना. परकीय देशांच्या भाषेचे ज्ञान घेताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करु नका. आपल्या मातृभूमीचा व मातृभाषेचा सदैव अभिमान बाळगा, असे त्यांनी सांगितले.
नाविन्यपूर्ण बाबींचे अधिकाधिक ज्ञान ग्रहण करुन विद्यार्थ्यांनी विद्वान बनावे,असे सांगून राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘भारत’ हा प्राचीन काळापासून अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो, भविष्यात देखील आपला देश विविध बाबींमध्ये अग्रेसर ठरण्यासाठी आपल्या ज्ञानाचा देशहितासाठी उपयोग करा आणि जगभरात चांगले नाव कमवा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत, असे सांगून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये आजवर अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व संस्थेचे कौतुक केले.
कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे तसेच त्यांना आपल्या शैक्षणिक संस्थेत टिकवून ठेवणे हे आव्हान असते. विद्यार्थी हिताचे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करुन त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करणे महत्वाचे असते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेत विविध चांगल्या संकल्पना व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे म्हणाले, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाने नेहमीच भर दिला आहे. भविष्यात या संस्थेचा आणखी विस्तार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.