Grand opening of the 35th Pune Festival

35 व्या पुणे फेस्टिवलचे शानदार उद्घाटन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे -लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी सार्वजनिक उत्सव महाराष्ट्रात रुजवला. हा लोकमान्यांचा विचार पुढे पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू ठेवला. हा सातत्याने 35 वर्षे सोहळा सुरू ठेवला असे कौतुक कलमाडी यांचे महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. गेली 30 वर्षे मी आमदार आहे, पण मला या सोहळ्याला येण्याचे भाग्य मला मिळाले नाही. या सोहळ्याचे निमंत्रणासाठी मी आजपर्यंत वाट बघत होतो. आज पर्यटन मंत्री झाल्यावर येण्याचा योग आला आहे, हे माझे भाग्य आहे असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा गौरवशाली 35 वे वर्ष साजरे करीत आहे. पुणे फेस्टिव्हलेच उदघाटन महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मोठ्या उत्साहात झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खासदार रजनी पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार श्रीरंग बारणे यावेळी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अभय छाजेड, जेष्ठ नेते उल्हासदादा पवार आमदार रवींद्र धंगेकर, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थितीत होते.

गिरीश महाजन म्हणाले, पुणे फेस्टिव्हलमध्ये 35 वर्षे सातत्य टिकून ठेवणे सोपे नाही. लोकांना एकत्रित करण्यासाठी लोकमान्यांनी गणपती उत्सव सुरू केला. या उत्सवापासून त्यांनी प्रेरणा घेतली. या सोहळ्यात बहारदार कार्यक्रम होत आहे. कलाकारांना व्यासपीठ मिळत आहे. काम करणाऱ्याचा गौरव होत आहे ही ऊलेखनिय बाब आहे.

पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक  सुरेश कलमाडी आपल्या स्वागतपर भाषणात म्हणाले, सध्या महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून हे सावट दूर व्होवो, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करतो. 1989 मध्ये या सोहळ्याची सुरुवात मी केली. भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या साक्षीने या सोहळ्याची सुरुवात झाली होती.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्याच्या विकासासाठी कलमाडी यांचे योगदान आहे, हे कधीही विसरता येणार नाही. राजकीय, सामाजिक परंपरा त्यांनी जपली आहे. 35 वर्ष त्यांनी हा सोहळा पुढे नेला आहे. हे कौतुकास्पद आहे.

खासदार रजनी पाटील म्हणाल्या, पुणे सांस्कृतिक नगरीत पुणे फेस्टिव्हलच्या निमित्ताने खासदार कलमाडी यांनी नाते घट्ट केले. सांस्कृतिक मूळ घट्ट करण्याचे काम या सोहळ्याने केले आहे. पुण्याला खऱ्या अर्थाने घट्ट जोडून ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला पाहिजे. राजकारणात त्यांची सदैव कमी भासते, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

श्रीरंग बारणे म्हणाले, कलमाडी यांनी सोहळाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. या उत्सवाचे देशभरात कौतुक होत आहे.

डॉ. के. एच. संचेती म्हणाले, खूप पुरस्कार मिळाले आहेत. हा घरचा पुरस्कार आहे. हा क्षण माझ्यासाठी अवसमरणीय आहे.

राधे राधे  वंदन करून खासदार हेमा मालिनी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, 35 वर्षे मी या सोहळ्यात सातत्याने सहभागी आहे. या सोहळ्यात सहभागी होत असल्याने मला राजकारणात देखील संधी मिळाली.

संजय घोडवत म्हणाले, पुणे फेस्टिव्हलमध्ये सन्मान होणे हे माझे भाग्य आहे. हा सन्मान माझ्याबरोबर कुटुंबाचा सहकाऱ्यांचा आहे. मी हा क्षण विसरू शकत नाही.

नाना पटोले म्हणाले, पुणे शहरात खासदार कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातुन सांस्कृतिक वारसा जपला. या फेस्टिव्हलचे वटवृक्ष झाले आहे. या सोहळ्यातून नवीन कलाकारांना आपली कला साधण्याची संधी मिळते. पुणे फेस्टिव्हल कलाकारांना दिशा देणारे उपक्रम राबवत असल्याचे कौतुक यावेळी त्यांनी केले.

ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना पद्मश्री खासदार हेमामालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन असून पुणे फेस्टिव्हलच्या स्थापनेपासून सलग 35 वर्षे पुणे फेस्टिव्हलमध्ये त्या सक्रियपणे सहभागी होत असतात. हेमामालिनी यांनी तब्बल 30 वर्षे बॅले, गणेश वंदना अथवा शिवस्तुती पुणे फेस्टिव्हलच्या मंचावर सादर केली आहे. यंदाच्या सोहळ्यातदेखील त्यांनी गणेश वंदना सादर करून रसिकांची दाद मिळवली. पुणे फेस्टिव्हलमध्ये त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल  त्यांचा सोहळ्यात विशेष गौरव करण्यात आला.

  विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणारे ज्येष्ठ अस्थीरोगतज्ञ पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांना े जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले आले. तसेच संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवार्ड’  देऊन सन्मानित करण्यात आले.

 सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणार्‍या पुण्यातील मंडळांचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव उर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ  ‘खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शुक्रवार पेठ’, ‘श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट’, सोमवार पेठ, पुणे आणि सदाशिव पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (श्री शिवाजी मंदिर) यांना ’जय गणेश’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

प्रारंभी गणरायाची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. वेदमूर्ती पंडित धनंजय घाटे गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

पुणे फेस्टीव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टीव्हलचे आयोजन केले जाते. पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळ्याचा ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. ढोलताशाच्या निनादात दीपप्रज्वलन व आरती  करण्यात आली. हिंदुस्तानी कर्नाटकी शास्त्रीय गायिका नंदिनी गुजर यांनी गणेशस्तुती सादर केली. पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री व नृत्यांगना हेमामालिनी सहकलावंतांसह ‘गणेश वंदना’ सादर केली. तसेच नितीन महाजन यांच्या केशव शंखनाद पथकाचे 40 जणांचे पथक मंचावर एकत्रित शंखवादन झाले. महाराष्ट्र मंडळाच्या विविध वयोगटातील 40 मुले – मुली ‘कलात्मक योगासने’ची प्रात्याक्षिके सादर  केली. त्यामध्ये पूर्ण उष्ट्रासन, पूर्ण वृश्चिक आसन, पूर्ण धनुरासन, गोखील आसन आणि डिंबासन याची प्रात्यक्षिके सादर केली. याचे संयोजन महाराष्ट्र मंडळ योग वर्गाच्या पल्लवी कव्हाणे यांनी केले. 

रामायणातील सीतेचे अपहरण, रावणाचे क्रूर वर्तन, सीतेची पतीनिष्ठ आदींवर आधारित ‘सीता’ ही नृत्यनाटिका सादर  करण्यात आले. यामध्ये अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर सीतेची भूमिका बजावली. व ओम डान्स अकादमीचे विद्यार्थी साथ दिली. नृत्य दिग्दर्शन ओंकार शिंदे यांनी केलेे. 

 विठ्ठल विठ्ठल नामघोष व टाळमृदुंगाच्या नादात विठ्ठलाचा जयघोष करीत नाचत गात जाणार्‍या वारकर्‍यांचा ‘विठ्ठल विठ्ठल’ हा कार्यक्रम नृत्य दिग्दर्शिका वृंदा साठे सादर केला. याची संकल्पना आणि संयोजन करूणा पाटील यांचे आहे. 61 कलाकारांचा यात समावेश होता. ‘कॅलिडोस्कोप – लावणी फ्युजन’ या कार्यक्रमात अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, संस्कृती बालगुडे, अमृता धोंगडे, आयली घिया, ऋतुजा जुन्नरकर, भार्गवी चिरमुले आणि रुपाली भोसले यांचा समावेश होता. पायलवृंद संस्थेच्या प्रमुख ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे यांनी याचे नृत्य दिग्दर्शन व संयोजन केले. ‘सुरमणी’ सानिया पाटणकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची गीते सादर केली.

   अभिनेत्री व नृत्यांगना हेमामालिनी यांच्यावर चित्रित केलेल्या चित्रपटातील गाण्यांवर आधारित ‘गोल्डन इरा ऑफ ड्रीम गर्ल’ हा नृत्य कार्यक्रम सादर झाला. त्यामध्ये अभिनेत्री उर्मिला कानेटकर, नुपूर दैठणकर, श्वेता शेवाळे, मयुरेश पेम यांच्यासह नृत्य तेज अकादमीचे सहकलावंतां सहभाग घेतला होता. नृत्यतेज अकादमीच्या प्रमुख नृत्य दिग्दर्शिका तेजश्री अडीगे यांनी याची संकल्पना व संयोजन होती. ‘हिस्टोरिकल एम्पायर्स ऑफ इंडिया’ या कार्यक्रमात पोनियन सेलवन, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, शेर शिवराज आणि मनीकर्णिका या ऐतिहासिक चित्रपटातील गाण्यांवर अभिनेत्री नृत्यांगना शर्वरी जेमिनीस, आशय कुलकर्णी आणि कुणाल फडके यांनी नृत्याविष्कार सादर केले. याची संकल्पना आणि संयोजन स्वप्नील रास्ते यांनी केली.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठीतून मंजिरी धामणकर व  इंग्रजीतून दुरीया शिपचांडलर यांनी केले.

35 व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प आणि नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअ‍ॅलीटी, आहुरा बिल्डर, बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *