पुणे(प्रतिनिधी)–‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सरकारच्या वेबसाईटवर लाभार्थी महिलांची संख्या १ कोटी १२ लाख दिसत असताना, सरकार १ कोटी ७ लाख महिलांनाच पैसे मिळाल्याचे सांगत आहे. या संख्येतील तफावत आणि निकषात न बसणाऱ्यांना मिळालेले पैसे हा ‘इलेक्टोरल भ्रष्टाचार’ असून सर्व शिक्षा अभियान आणि आरटीई साठी असलेला निधी वळवून तो ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी वापरला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी येथे केला. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता नसल्यामुळे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
पुणे शहरासह राज्यातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सरकारी योजनांमधील अनागोंदी कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. पुणे महानगरपालिकेत प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी आलेल्या सुळे यांनी यावेळी गृह विभाग, निवडणूक प्रक्रिया आणि राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनावर अनेक प्रश्न उपस्थित केले
सुप्रिया सुळे म्हणल्या, राज्य सरकारने ‘सर्व शिक्षा अभियान’ आणि ‘आरटीई’ साठी असलेला निधी शाळांना किंवा शिक्षकांना न देता तो ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी वळवला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील आर्थिक नियोजनावर परिणाम होत आहे. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर लाभार्थींच्या आकड्यांमधील तफावतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हे लाभार्थी नक्की कोण आहेत, असा सवाल त्यांनी केला.
त्यांनी एफआरपीएम कायद्याचा उल्लेख करत सांगितले की, राज्याची वित्तीय तूट वाढली आहे. या योजनेसाठी निधी खर्च केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, सबसिडी आणि इतर आवश्यक कामांसाठी पैसे वेळेवर मिळत नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. सुरुवातीला निकषात न बसणाऱ्यांना, सरकारी नोकरीत असलेल्यांना आणि काही ठिकाणी पुरुषांच्या नावावरही पैसे जमा झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हे पैसे कोणत्या खात्यात गेले आणि केवायसी प्रक्रिया कशी झाली, याबाबत शंका उपस्थित करत, केंद्र सरकारची जनधन योजना आणि आधार कार्ड ही यंत्रणा आधीपासूनच उपलब्ध असताना, तिचा वापर करून पारदर्शकपणे पैसे का दिले गेले नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यमुळे हा ‘इलेक्टोरल भ्रष्टाचार’ असा आरोप त्यंनी केला.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावरही निशाणा साधला. विधान परिषद निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या उमेदवाराने थकवलेला टॅक्स आणि प्रतिज्ञापत्रातील त्रुटींवरून त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. अजित पवार गटातील अंतर्गत नाराजीवर बोलताना त्या म्हणाल्या की, ज्या निष्ठावंतांनी ४० वर्षे साथ दिली, त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
अजित दादांची विधाने आणि विचार नाकारण्याचे “पाप” काही लोकांनी केले
“अजित दादा असते तर गोष्टी वेगळ्या असत्या” असे म्हणणाऱ्यांवर टीका करताना त्या म्हणाल्या की, त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्वी काही गोष्टी निर्मळ मनाने सांगितल्या होत्या, परंतु तेव्हा त्यांना खोडून काढण्यात आले होते. मात्र, आता तेच लोक आपली भूमिका बदलून “दादांची इच्छा होती, दादा बोलले होते, दादा एकटे जात होते” असे सांगत आहेत .दादांनी (अजित पवार) स्वतः अनेक पत्रकारांशी चर्चा केली होती आणि त्यांच्या मनात काय चालले आहे हे सांगितले होते, याचे साक्षीदार स्वतः पत्रकार आणि ‘पांडुरंग’ आहेत असे सुळे यांनी नमूद केले. दादांनी गट बदलल्यानंतर काही लोकांनी जाणीवपूर्वक त्यांची विधाने आणि विचार नाकारण्याचे “पाप” केले, अशी टीका केली. काही लोक आता सोयीनुसार विधाने बदलून ‘यू-टर्न’ घेत आहेत, परंतु आमचे राजकारण हे केवळ जनतेच्या सेवेसाठी आहे. “माझा दादा आता राहिला नाही” अशा शब्दांत त्यांनी आपली वैयक्तिक भावना व्यक्त करत सध्याच्या राजकीय संघर्षावर भाष्य केले.
या नाराजीचा महाविकास आघाडीला फायदा होईल का, यावर थेट भाष्य करणे सुळे यांनी टाळले. दुसऱ्या गटात काय चालले आहे हे पाहण्यापेक्षा महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते, असे त्या म्हणाल्या.
पुणे शहराच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरताना सुळे यांनी सांगितले की, शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. विशेषतः ‘कोयता गँग’चा हैदोस आणि कात्रज चौकासारख्या सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या हिंसक घटना चिंताजनक आहेत. पुणे शहर, महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विभागाकडे असलेली गुन्हेगारीची आकडेवारी वेगवेगळी आहे. “डेटा नक्की कोणाचा खरा?” असा सवाल करत त्यांनी पोलीस यंत्रणेवरही निशाणा साधला. टीव्ही चॅनेलवर गुन्हेगारीचे व्हिडिओ दिसत असताना पोलिसांना ते का दिसत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुणे पोलीस आयुक्तांनी त्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत सुळे म्हणाल्या की, हे पत्र मला लिहिण्याऐवजी देशाच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहायला हवे होते, कारण डेटा त्यांच्याच विभागाकडून येतो.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर बोलताना त्यांनी अजित पवार गटाच्या उमेदवाराचा उल्लेख केला. एका उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात सर्व कर भरल्याचे नमूद केले असतानाही, छाननीच्या वेळी ४० हजार रुपयांचा टॅक्स भरल्याचे समोर आले. जर प्रतिज्ञापत्रात माहिती चुकीची असेल, तर त्या अर्जाचे महत्त्व काय, असा तांत्रिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुणे आणि शिरूरच्या विकासासाठी खासदार अमोल कोल्हे आणि त्या स्वतः दरमहा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या वतीने बैठका घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कांद्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांची दयनीय अवस्था यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. लातूर, हिंगोली आणि नंदुरबार येथील शेतकरी डिझेलसाठी तासनतास रांगेत उभे आहेत, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात व्यस्त आहेत, अशी टीका करत हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील असल्याची तोफ त्यांनी डागली. [
















