पुणे(प्रतिनिधी)–स्वतःला भगवान महादेवाचा अवतार सांगून एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य नावाच्या भोंदू बाबाला पुणे पोलिसांनी पिंपरी परिसरातून अटक केली असून, न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच, पुण्यात समोर आलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाची सुरुवात २०२३ मध्ये झाली, जेव्हा पीडित महिला आणि आरोपी ऋषिकेश वैद्य यांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपीने पीडितेवर आपला प्रभाव पाडण्यासाठी आपण साक्षात महादेवाचा अवतार असल्याचे आणि ती आपली ‘पार्वती’ असल्याचे भासवून तिला विश्वासात घेतले. डिसेंबर २०२३ मध्ये वैद्य तिला भेटण्यासाठी पुण्यात आला होता. यावेळी त्याने पीडितेला मांजरी परिसरातील एका लॉजवर नेले, तिथे तिला काहीतरी गुंगीचे पदार्थ पिण्यास देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्या कृत्याचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढले, अशी गंभीर तक्रार पीडितेने नोंदवली आहे.
या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून सुरुवातीला हा गुन्हा वसई येथे दाखल झाला होता, जो नंतर पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यच्या मागावर होते. शनिवारी तो आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कारने पुण्याकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, पोलिसांनी पिंपरी परिसरात सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.
दरम्यान, पुण्यातील लष्कर न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने आरोपीच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, आरोपीने अशाच प्रकारे इतरही महिलांची फसवणूक केली आहे का, याचा तपास करणे आवश्यक आहे . तसेच, त्याने पीडितेचे काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत का, हे तपासण्यासाठी त्याचा मोबाईल, चॅटिंग आणि इतर तांत्रिक पुराव्यांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. तपासासाठी आरोपीला पुणे आणि वसई अशा दोन्ही ठिकाणी नेणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हा गुन्हा पूर्णपणे खोटा असल्याचा दावा केला. पीडित महिलेनेच स्वतःहून फेसबुकद्वारे संपर्क साधला होता आणि कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. आरोपी केवळ धार्मिक प्रवचन करणारा असून त्याची पार्श्वभूमी स्वच्छ असल्याचेही वकिलांनी नमूद केले आणि लॉजवरील सीसीटीव्ही तपासून सत्य समोर आणावे, अशी मागणी केली. आरोपीच्या भावानेही या प्रकरणाची तुलना अशोक खरातशी करणे चुकीचे असल्याचे म्हटले असून सत्य लवकरच समोर येईल असा विश्वास व्यक्त केला आहे . मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ऋषिकेश वैद्यला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
















