सासरच्या जाचाला कंटाळून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या; पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

सासरच्या जाचाला कंटाळून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या
सासरच्या जाचाला कंटाळून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या

पुणे(प्रतिनिधी)–पुण्यातील कात्रज परिसरात एका २० वर्षीय तरुणाने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहम्मद साद आसिफ सय्यद असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी त्याची पत्नी, सासू आणि मेहुण्यासह एकूण सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ मार्च २०२६ रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कात्रजमधील संतोष नगर भागातील डिलाईट बेकरीसमोर घडली. मोहम्मद साद हा तिथे उभ्या असलेल्या एका रिक्षात असताना त्याने ‘रॅट किल’ (उंदीर मारण्याचे औषध) हे विष प्राशन केले. त्याला तातडीने उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत सादचे वडील नौशाद तन्वीर अहमद (वय ४१), जे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे राहणारे पत्रकार आहेत, यांनी पोलीस तक्रार दिली आहे.

अधिक वाचा  पुणे शहरात विविध अपघातात चार जणांचा दुर्देवी मृत्यू 

तक्रारीनुसार, ७ मार्च ते १२ मार्च २०२६ या कालावधीत मोहम्मद सादला त्याच्या पत्नीकडून आणि सासरच्या मंडळींकडून वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत होती. सादची पत्नी करीमुन्निसा उर्फ निशा, सासू रेश्मा कामरू खान आणि मेहुणा सरवर उर्फ कैफ कामरू खान यांच्यासह इतर नातेवाईक त्याला सातत्याने अपमानित करत असत. या सततच्या मानसिक दबावामुळे, अपमान आणि मारहाणीमुळे हताश होऊन सादने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

आंबेगाव पोलिसांनी या प्रकरणी करीमुन्निसा (पत्नी), सरवर उर्फ कैफ कामरू खान (मेहुणा), रेश्मा कामरू खान (सासू), शमा जावेद शेख (नणंद), जावेद शेख (मेहुणा), अथर्व काळे (मेहुण्याचा मित्र) आणि इशिता अशा सात जणांवर गुन्हा (एफआयआर क्र. ११८/२०२६) दाखल केला आहे . या सर्वांवर भारतीय न्याय संहितेच्या  कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ११५(२) (इच्छापूर्वक दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) आणि ३(५) (सामूहिक जबाबदारी) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

अधिक वाचा  Pune Hooch Tragedy: केवळ ६,६०० रुपयांच्या फायद्यासाठी २२ जणांचा बळी! मुख्य आरोपी वानखेडेचा 'डेथ प्लॅन' उघड

सदर प्रकरणाचा तपास आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मारुती वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love