मुंबई – वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या परीक्षा कधी आणि कशा घ्याव्यात याबाबत राज्यसरकार समोर प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, आज यासंदर्भात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत निर्णय झाला असून या परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसून देता येणार आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारच्या या निर्णयाला राज्यपालांनीही मंजुरी दिल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार असून असून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उद्या १२ वाजता अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा होऊ शकतात. यासंबंधी कुलगुरु निर्णय घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षादेखील विद्यार्थ्यांना केंद्रावर न येता देता यावी यासाठी प्रयत्न असून तसाच अहवाल तयार करण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले. उद्या १२ वाजता अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील अशीच शक्यता आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असणार आहे,” अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. युजीसीकडे अहवाल दिल्यानंतर ३१ ऑक्टोबपर्यंत निकाल लागण्याचं बंधन विद्यापीठांवर असणार आहे असंही ते म्हणाले.
घरात बसून परीक्षा घेण्यात यावी यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू, असं सामंत यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी किंवा मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावून युजीसीला विनंती करण्याबाबत निर्णय घेऊ. ३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निकाल लावू शकतो ही जी कुलगुरुंनी भूमिका घेतली आहे ती आम्ही युजीसीकडे मांडू,” असं उदय सामंत यांनी सांगितल.