पुण्यनगरी भक्तिरसात चिंब : दर्शनासाठी भाविकांची रिघ 

Devotees experience gratitude by bowing their heads at the feet of Mauli-Tukoba.
Devotees experience gratitude by bowing their heads at the feet of Mauli-Tukoba.

पुणे(प्रतिनिधी)–विठुनामाचा गजर…अभंगांत दंगलेले वारकरी…अन् ज्ञानोबा-तुकोबांच्या दर्शनासाठी लागलेली भाविकांची रीघ…यामुळे अवघी पुण्यनगरी सोमवारी भक्तिरसात चिंब झाली. माउली-तुकोबांच्या पादुकांवर आपला माथा टेकवत भाविकांनी कृतार्थतेचा अनुभव घेतला. 

संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी पुण्यात मोठय़ा उत्साहात दाखल झाल्या. या पालख्यांच्या आगमनाने पुण्यनगरी भारावली.  सकाळपासूनच हजारो भाविकांची पावले दर्शनासाठी पालखी विठोबा मंदिर व निवडुंग्या विठोबा मंदिराच्या दिशेने वळली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. तरुण, चिमुकले, ज्येष्ठ दर्शनासाठी आलेले पहायला मिळाले. पालख्यांसोबत आलेल्या वारकऱयांनी विविध पेठांत आपला मुक्काम ठोकला होता. 

मुक्कामादरम्यान दिंडय़ादिंडय़ांत अभंग घुमत होते…विठ्ठल नामाचा रे टाहो…प्रेभभाव…असा विठुनामाचा गजर होत होता. येथील रस्तेही भाविकांच्या भक्तीने फुललेले. शहरातील मठ, मंदिरे, मोकळय़ा जागा सर्वत्रच विठ्ठलच भरून राहिलेला. अवघा आसमंतच विठ्ठलमय झालेला. भजन, कीर्तनात, भक्तिरसात पुण्यनगरी न्हाऊन गेली.  पुण्यातील नागरिकांनीही या सोहळय़ाचे मनोभावे आदरातिथ्य केले. पुण्यात वारकऱयांना ठिकठिकाणी अन्नदान करण्यात आले. तसेच विविध सेवासुविधा पुरविण्यात आल्या. 

अधिक वाचा  राज्यातील लोककलावंतांच्या महितीची सूची तयार करणार - राजेंद्र पाटील येड्रावकर

 मंदिरांवर विद्युतरोषणाई आणि फुलांची सजावट

निवडुंग विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिर या दोन्ही मंदिरांवर विद्युतरोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात असलेल्या पालखी रथांच्या बरोबर फोटो काढण्यासाठीदेखील पुणेकरांनी गर्दी केली होती. त्या रथाबरोबरचे फोटो अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केले. 

 सीसीटीव्हीची नजर अन् पोलीस बंदोबस्त

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही मंदिर परिसरामध्ये सीसीटीव्हीची नजर होती. पोलिसांचा बंदोबस्तही मोठय़ा प्रमाणावर ठेवण्यात आला होता. नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस मदत कक्ष, मनपा मदत कक्ष उभारण्यात आले होते. 

शनिवारवाडा, लाल महालाचा परिसर वारकऱयांच्या गर्दीनी फुलला

मुक्कामाचा दिवस म्हणजे थोडाफार निवांतपणा असतो. भक्तीचा जागर घडवतानाच पुणे मुक्कामी वारकऱयांनी हा निवांतपणाही अनुभवला. वारकऱयांनी पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा, लाल महाल भेटी दिल्या. त्यामुळे शनिवारवाडा आणि लाल महालाचा परिसर वारकऱयांच्या गर्दीने फुलून गेला होता. शनिवारवाडा, लाल महालासोबतच पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठीही वारकऱयांनी गर्दी केली होती. 

अधिक वाचा  आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची 'ईडी'मार्फत चौकशी : रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार?

विविध सामाजिक संस्थांकडून वारकऱयांसाठी आरोग्यविषयक उपक्रम

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट व आचार्य आनंदऋषीजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वारीत सहभागी झालेल्या सुमारे चार हजार वारकऱयांची डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने मंदिरामध्ये वारकऱयांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषधे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 1500 हून अधिक वारकऱयांनी सहभागी होत आरोग्य तपासणी केली. विश्वास आधार स्वयंरोजगार संस्था आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने आरोग्यदायी वारीसाठी औषध पेटी वाटप उपक्रम राबविण्यात आला.

माउलींची पालखी आज सासवडकडे 

दरम्यान, माऊलींची पालखी मंगळवारी सासवडच्या दिशेने रवाना होणार आहे. दिवे घाटाचा अवघड टप्पा याच मार्गावर आहे. 28 किमीचा हा टप्पा वारकरी हरिनामाच्या बळावर सहजगत्या पार करतात. दिवे घाटही माउलींच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे. दिवे घाटाची हिरवाई, माउलींच्या पालखीचा थाट, हे विहंगम दृश्य याची देही याची डोळा उद्या अनुभवता येणार आहे. तर तुकोबांची पालखी लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पुणेकर मंगळवारी या दोन्ही पालख्यांना भावपूर्ण निरोप देतील. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love