लोकसंस्कृती हा साहित्याचा गाभा आहे-डॉ.मोहन आगाशे

कला-संस्कृती
Spread the love

पुणेः- लोकसाहित्य हे अस्सल साहित्य आहे. पूर्वी पहाटेपासून दिवसभर काम करून थकलेले लोक सूर्यास्तानंतर मनोरंजनासाठी नृत्य, गायन आणि वाद्यवादन करीत असत. या कलाविष्कारातून लोकसाहित्य निर्माण झाले. लोकसंस्कृती हा साहित्याचा गाभा आहे, Folk culture is the core of literature असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. 

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठनतर्फे आयोजित 20 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात आज यशंवतराव चव्हाण नाट्यगृहात ‘वाग्यज्ञ साहित्य व कला गाैरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखिका डाॅ. अरुणा ढेऱे आणि अभिनेते मोहन जोशी यांना ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रोख रुपये 11 हजार आणि सन्मान चिन्ह असे स्व. रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणा-या या पुरस्काराचे स्वरुप आहे.

यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, गरवारे टेक्निकल फायबर लिमीटेडचे संचालक डॉ.श्रीधर राजपाठक, गरवारे टेक्निकल फायबर लिमीटेडचे जनसंपर्क अधिकारी मकरंद पाचडे, गरवारे बेस्टस्ट्रेजचे व्यवस्थापक अनिल देहडीराय, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे म्हणाले की, साहित्य-कला आणि तंत्रज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साहित्य- कला यातून कसं जगायचं हे शिकायला मिळतं, तर तंत्रज्ञान आनंद देण्याचे काम करते. जाणीव आणि नेणीव यांना एकत्र बांधण्याचे काम साहित्य करते. साहित्य-कला म्हणजे माणसाचा प्राणवायू आहे. केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा याच माणसाच्या मुलभूत गरजा नाहीत. तर साहित्य आणि कला यांनाही मानवी जीवनात तितकेच महत्त्वाचे स्थान आहे. साहित्य सर्व माणसांना एका पातळीवर आणण्याचे काम करते. व्यवसायाने वेगवेगळे असलेले लोक साहित्याच्या समान धाग्याने एकाच पातळीवर येतात.

यावेळी बोलताना प्रसिद्ध लेखिका डॉ. अरूणा ढेरे म्हणाल्या की, आजच्या पुरस्काराचे जे नाव आहे, त्या वाग्यज्ञाची संकल्पना मांडणारी वैश्विक प्रार्थना आपल्या भूमीत निर्माण झाली आहे, याचे मला अप्रुप आणि अभिमान आहे. संतांनी आपल्या अलौकीक साधनेव्दारे अध्यात्माची जी पातळी गाठली, त्या पातळीपर्यंत जनमानसाला घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील या संतांनी केला. मळलेल्या वाटेवरून चालण्याऐवजी जनसामान्यांनी देखील अध्यात्माच्या आनंदी वाटेवरून वाटचाल करावी, म्हणून जनसामान्यांचे बोट हातात धरून संतांनी त्यांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. सामान्य पातळीवरील लोकांना देखील अध्यात्माचा आनंद मिळावा, म्हणून ते झटत होते. संतांच्या जीवनात देखील अनेक कडू घटना घडल्या, अनेक कटु प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. मात्र, त्या सगळ्याच्या पुढे जाऊन त्यांनी जगण्याचा आनंद इतरांना वाटला. कर्मकांड म्हणजे भक्तीमार्ग नाही, असे सांगून संतांना जनसामान्यांना कर्मकांडापासून दूर केले. धर्माच्या नावाखाली होत असलेले सर्वसामान्यांचे शोषण त्यांना कधीच मान्य नव्हते. त्यामुळे सामान्य भक्तांना कर्मकांडापासून परावृत्त करून त्यांना ख-या भक्तीमार्गाकडे नेण्याचे कार्य संतांनी केले.

अभिनेते मोहन जोशी म्हणाले की, माझे पूर्वाश्रमीचे आयुष्य खूपच कष्टप्रद आणि वेगळ्या धाटणीचे होते. मुंबई या शहराविषयी माझे काही दुषित पूर्वग्रह होते. मात्र, मला उत्तम दिग्दर्शक आणि चांगल्या कलाकारांचा चमु मिळाल्याने मी अभिनय क्षेत्रात पुढे येऊ शकलो. मानसिंग पवार यांनी असे पाहुणे येती ही मालिका मला दिली आणि त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. नाटकाचे दौरे आणि मालिका तसेच चित्रपटांच्या निमित्ताने मी संपूर्ण भारतभ्रमण केले. त्यामुळे मी अधिक अनुभवसंपन्न झालो. आजच्या तरूण पिढीने ज्येष्ठांच्या अनुभवातून शिकणे अपेक्षित आहे. ज्येष्ठांचे एेकणे, त्यांच्या वाटेवरून चालणे हे पुढच्या पिढच्या जडणघडणीसाठी आवश्यक आहे. कारण कष्ट आणि तपश्चर्या याशिवाय यश मिळत नाही, हे तरूण पिढीने लक्षात ठेवले पाहिजे. समाजाने मला खूप काही दिले आहे आणि आता मी समाजाचा उतराई होण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे समाजातील वंचित आणि दुर्बल घटाकांना मी वेळोवेळी मदत करीत असतो. मी देहदान करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाच्या माध्यमातून देखील समाजाचे ऋण फेडण्याचा माझा मानस आहे.

यंदा या संमेलनाचे 20 वे वर्ष आहे. मात्र कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आजचे इतर कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात आले. सकाळी झालेल्या ‘जम्मू काश्मिरमधील ‘कलम 370′ आणि ’35 अ’ हटवल्यामुळे हा राष्ट्रीय प्रश्न संपला का?’ या विषयावरील परिसंवादात उल्हासदादा पवार आणि माधव भांडारी सहभागी झाले होते. त्यानंतर ‘भारुडातून प्रबोधन’ हा कार्यक्रम राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भारुडकार चंदाताई तिवाडी आणि त्यांच्या सहका-यांनी सादर केला.

संमेलनाच्या समारोप प्रसंगी कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचे कवी संमेलन झाले. त्यामध्ये रमण रणदिवे, ऐश्वर्य पाटेकर, शिवाजी सातपुते, मनोहर आंधळे, देवा झिंजाड, प्रशांत केंदळे, मृणालिनी कानिटकर आणि अस्मिता जोगदंड यांनी कविता सादर केल्या. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे यांनी केले. सूत्रसंतालन साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि.दा. पिंगळे यांनी केले. शाहीर बाबासाहेब जाधव यांनी आभार मानले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *