महिलांच्या कल्पक पेंटिंगने बालगंधर्व कलादालन सजले

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–३४व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही बालगंधर्व कलादालन येथे महिलांच्या पेंटिंग्जची स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. देशातील ३५० हून अधिक चित्रकार महिलांच्या ‘आकृती’ ग्रुप तर्फे यंदा पुणे फेस्टिव्हल अंतर्गत पोट्रेट व कंपोझिशन अशी चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन दि. १ ते ३ सप्टे. या काळात आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन गुरुवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राज्य कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे व पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांचा हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले.

या प्रसंगी ‘बोलत्या रेषा’ म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध चित्रकार घनशाम देशमुख व ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी  विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. प्रसिद्ध चित्रकार गोपाळ नांदुरकर, प्रा. डॉ. राजेत्री कुलकर्णी व चित्रकार सुरेश लोणकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेचा विषय ‘ट्रिब्यूट टू लेजेंड्स’ असा असून यावर्षी निधन पावलेल्या भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार, पद्मविभूषण पं. बिरजू महाराज, पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व पद्मभूषण राहुल बजाज  यांच्यावर पोट्रेट या महिला स्पर्धक काढली आहेत. यावेळी अनेक नामवंत कलावंतांनी पोट्रेटचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केले.

निवेदिता प्रतिष्ठान अंतर्गत असणाऱ्या महिलांच्या ‘आकृती’ ग्रुप तर्फे १3वे चित्र प्रदर्शन आहे. प्रारंभी संयोजिका अनुराधा भारती यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. पुणे फेस्टिव्हल मध्ये हा अतिशय चांगला  उपक्रम आहे असे उल्हास पवार यांनी सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुणे फेस्टिव्हल मध्ये महिलांचा कला गुणांना वाव देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो असे पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई म्हणाले. ज्योती पाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. अनिता देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

या स्पर्धेत १०० हून महिलांची पेंटिंग प्रदर्शित केली गेली. या चित्रकारांचे प्रदर्शन  दि. १, २ व ३ सप्टे. रोजी सकाळी १०.०० ते रात्री ८.०० या वेळेत सर्वांसाठी विनामुल्य खुले असेल. अशी माहिती संयोजिका अनुराधा भारती यांनी दिली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *