पुणे : अखेरच्या टप्प्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आकर्षण असलेल्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी माती विभागात सिंकदर शेख (Sikandar Shaikh) आणि संदीप मोटे (Sandeep Mote) , तर गादी विभागात हर्षद कोकाटे (Harshad KOkate) , शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) यांच्यात अंतिम लढत होईल. यानंतर यातील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) किताबाची लढत खेळविली जाईल. या दोन्ही लढती उद्या शुक्रवारी खेळविण्यात येतील. (Sikandar Shaikh, Sandeep Mote’s final fight on clay: Harshad, Shivraj face each other in Gadi division)
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्पर्धा सुरु आहे.
गादीवरील चुरशीच्या लढतीत हर्षद कोकाटेने पृथ्वीराज पाटीलचे आव्हान सहज परतवून लावले. पहिल्या फेरीत सुरुवातीलाच हर्षदने ताबा मिळवत दोन गुणांनी खाते उघडले. पृथ्वीराजने काहीसा बचावात्मक पवित्रा घेत कुस्ती बाहेर काढत एक गुण मिळवला. याच आघाडीवर पहिली फेरी संपली. दुसऱ्या फेरीला पुन्हा एकदा हर्षलने ताबा मिळवत दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर पृथ्वीराजने एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. हर्षदने त्याला दाद दिली नाही. पृथ्वीराजने कुस्ती बाहेर काढत एक गुण मिळविला. त्यानंतर हर्षलने एकेरी पट काढण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला. यावेळी पृथ्वीराजने ठेवलेली पायाची पकड कमालीची मजबूत होती. त्यावेळी पृथ्वीराजने पलटी मारत २ गुणांची कमाई केली. अखेरच्या टप्प्यात पुन्हा एकदा हर्षदने दोन गुणांची कमाई केली आणि विजय निसटणार नाही याची काळजी घेतली.
गादीवरील अंतिम फेरीत हर्षदची गाठ आता शिवराज राक्षेशी पडणार आहे. शिवराज राक्षेने प्रतिस्पर्धी सुदर्शन कोतकरला संधीच दिली नाही. अनेकदा कुस्ती बाहेर काढत शिवराजने एकेक गुणांचा सपाटा लावला. वेगवान कुस्ती करण्याच्या प्रयत्नात त्याने ताबा मिळवत भारंदाज डावाचा सुरेख उपयोग करुन सुदर्शनला निष्प्रभ करून १०-० अशा तांत्रिक वर्चस्वावर विजय मिळविला.
संदीप, सिंकदरचा विजय
मातीवरील उपांत्य फेरीच्या लढतीत सांगलीच्या संदीप मोटेने मुंबई शहराच्या विक्रम भोसलेचा गुणांवर १०-१ असा पराभव केला. विक्रमचा ताबा आणि भारंदाज डावाचा पुरेपूर फायदा उठवत संदीपने विक्रमला फारशी संधी दिली नाही. विक्रमला पहिल्या फेरीत लढत बाहेर काढण्याची संधी मिळाली तेवढाच एकमात्र गुण विक्रमला मिळवता आला.
झपाट्यासारखी कुस्ती करणाऱ्या वाशीमच्या सिकंदर शेखसमोर मातीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत पुणे शहरच्या पृथ्वीराज मोहोळने तगडे आव्हान उभे केले. समान ताकदीच्या मल्लांनी ताकद आजमविण्यात वेळ घालवला. यासाठी दोघानांही पंचानी कुस्ती करण्याची ताकिद दिली. लढतीत पुन्हा तशीच वेळ आली तेव्हा सिंकदरला ताकिद दिली. त्या वेळी सिंकदरला गुण मिळविण्यात अपयश आल्याने पृथ्वीराजला १ गुण देण्यात आला. पृथ्वीराजने मग मध्यंतराला ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली तेव्हा पृथ्वीराजला ताकिद मिळाली आणि त्याला गुण मिळवण्यात अपयश आल्याने सिकंदरला एक गुण देण्यात आला. यानंतरही दोघांचा कल नकारात्मक कुस्ती करण्याकडेच राहिला. दुसऱ्यांदा ताकीद मिळाल्यावर सिकंदर गुण मिळवण्यात अपयश आल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला. पाठोपाठ याच नियमाच्या आधारावर सिंकदरला १ गुण मिळाल्याने लढत २-२ अशीच बरोबरीत राहिली. मात्र, अखेरचा गुण सिकंदरने मिळविल्यामुळे सिकंदरला विजयी घोषित करण्यात आले.