पुणे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेनंतर १ मेला औरंगाबाद येथे होणाऱ्या त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी राज ठाकरे हे शुक्रवारी पुण्यात आले असून आज (शनिवार) सकाळी साडेआठ वाजता पुण्यातून औरंगाबाद येथे जाणार आहेत. तत्पूर्वी, साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मण पुढील कार्य चांगल्याप्रकारे पार पाडावे यासाठी राज ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. तर पुण्यावरून औरंगाबादला जाताना त्यांच्यासोबत १०० ते १५० गाड्यांचा ताफा जाणार आहे. जाताना राज ठाकरे हे संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहे.
१०० ते १५० ब्राह्मण आशीर्वाद देण्यासाठी येणार
शनिवारी पुण्याहून औरंगाबादला रवाना होण्यापूर्वी १०० ते १५० ब्राह्मण पुढील कार्य चांगल्याप्रकारे पार पाडावे यासाठी राज ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी दिली आहे.
त्याच दरम्यान, तीन तारखेला रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुणे शहर मनसेकडून पुण्यातील सर्व मंदिरात महाआरतीच आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात मनसेकडून तयारी सुरू असून आज शहर कार्यालयात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्या संलग्न असलेल्या सात ते आठ संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.तसेच त्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.अशी माहिती मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी दिली आहे.
संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार
औरंगाबादला जाताना राज ठाकरे यांच्यासोबत १०० ते १५० गाड्यांचा ताफा जाणार आहे. यावेळी पुण्यावरून औरंगाबादेत जाण्यापूर्वी राज ठाकरे हे संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.
राज ठाकरे उद्या सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुण्यातून निघाल्यानंतर वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी राजे यांच्या समाधीस्थळी राज ठाकरे उद्या भेट देणार आणि दर्शन घेणार आहेत. सभेच्या आधी कुठला ही कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. पुण्यातून १०० गाड्या राज ठाकरे यांच्या बरोबर निघणार आहेत. इतर १० ते १२ हजार कार्यकर्ते सभेच्या दिवशी पुण्यातून सकाळी निघणार आहेत, असे देखील यावेळी वागस्कर यांनी सांगितले.
राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर पोलिसांनी परवानगी दिली आहे. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागून आहे. राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे १ मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून २५०० कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे.