मुंबई- उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळून आल्यानंतर या प्रकरणच्या तपासातून बडतर्फ एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. तर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खळबळजनक आरोप केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना बार, हॉटेल्स आणि इंटर संस्थांच्या माध्यमातून दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते असा खुलासा केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सचिन वाझे नर्नियुक्तिमध्ये मुख्यमंत्री आणि गरुमंत्र्यांचा काहीही हा नसल्याचे आणि वाझे यांना परमबीर सिंग यांनीच पुन्हा घेतल्याचे सांगितले होते. त्यावर विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित पत्रकार परिषद घेऊन पवारांवर निशाणा साधला आहे.
फडणवीस म्हणाले, परमबीर सिंग यांच्या समितिने वाझे यांची पुनर्नियुक्ति केली असे पवार म्हणतात परंतु, त्यांना एखादा बडतर्फ अधिकाऱ्याला महत्वाची जागा (एक्झिकयूटीव्ह पोस्ट) देता येत नाही हे माहिती नाही का? सर्व महत्वाच्या केसेस वाझे यांना देण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने आणि आदेशाने हे काम परमबीरसिंग यांनी केले आणि म्हणूनच एपीआय पदाचा व्यक्ति त्या महत्वाच्या पदावर गेला असा आरोप करत पून्हा रुजू करून घेताना हे सरकारला माहिती नव्हते का असा सवाल फडणवीस यांनी केला.
पवार साहेबांनी या घटनेची चौकशी निवृत्त डी. जी. रिबेरो साहेबांनी करावी असे म्हटले आहे. रिबेरो साहेबांबद्दल सर्वांना आदर आहे त्यांचे वय त्यांचा अनुभव मोठा आहे. चौकशी केवळ परमबीर सिंग यांची की या घटनेची ?म्हणजे फक्त परमबीर सिंग यांची की गृहमंत्र्यांची देखील असा सवाल फडणवीस यांनी केला. पदावर असलेल्या गृहमंत्र्यांची चौकशी अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डीजी हे करू शकतात का?कशाप्रकारे ते करणार? असे प्रश्न उपस्थित करत म्हणून आज या सरकारला वाचवण्याकरता पवार साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये केवळ विंडो ड्रेसिंग झाले आणि सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झाला आहे असे फडणवीस यांनी नमूद केले. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पवार साहेबांना सांगितले असे म्हटले आहे याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का बोलत नाही असा सवलाही त्यांनी केला. .
फार मोठे बदल्यांचे रॅकेट सुरू असल्याचे इंटेलिजन्सने सांगितले होते. पोलिसांच्या बदल्यांमधील रॅकेट आणि दलाली यासंदर्भातले संपूर्ण ट्रान्सक्रीप्ट संहित एक अहवाल सुबोध जैस्वाल यांनी सादर केला होता. तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांकडे गेला. त्यावर काहीच कारवाई झाली नाही. परमबीर सिंग यांच्या अगोदर असेच आरोप सुबोध जैस्वाल यांनी केला होता यांचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्र्यांची पाठराखण केली याचं आपल्याला आश्चर्य वाटल. परंतु, पवारांना दोष देणार नाही. कारण ते या सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे निर्मात्याला आपले सरकार कसेही वागले तरी त्याचा बचाव (डिफेंड) करण्याची भूमिका घ्यावीच लागते असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.