पिंपरी(प्रतिनिधि)–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल व डिझेल दरवाढीबाबत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल राज्यावर आरोप जे केले आहेत. ते चुकीचे आहेत. आपण भारताचे पंतप्रधान आहात की भाजपचे पंतप्रधान ? पंतप्रधानांनी एखाद्या राज्याकडे असे बोट दाखवणे म्हणजे पंतप्रधानांचा हा पक्षपातीपणाच आहे. पंतप्रधान मोदी केवळ महाराष्ट्र व पश्चिम बंगाललाच का टार्गेट करत आहेत? देशातील सर्व राज्यांना पेट्रोल-डिझेल कर कमी करण्याचे आवाहन मोदींनी का केले नाही? असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता रविकांत वरपे यांनी उपस्थित केला आहे.
वरपे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कोव्हिडविषयक बैठक घेतली. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करुन महाराष्ट्र सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला. पंतप्रधानांचा हा आरोप पक्षपातीपणाचा आहे. मुळात गेल्या सात वर्षांपासून जागतिक बाजारपेठेत रुपयाची किंमत कमी असतानासुद्धा तुम्ही पेट्रोल डिझेलच्या दरवाढीतून सर्वसामान्य जनतेकडून इंधनाच्या नावाखाली सात वर्षात २७ लाख कोटी कोटी रुपये वसूल केले आहेत. महाराष्ट्र सरकारने अगदी कोरोनाच्या काळातही पेट्रोल डिझेलवर करवाढ केलेली नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात घ्यावे. कोरोनाच्या संकट काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकास कामात अडचण येऊ दिली नाही. महाराष्ट्राचे हक्काचे जीएसटीचे पैसे देतानाही सहा सहा महिने मुद्दाम उशीर केला जातो. हक्काचे पैसेच जर वेळच्या वेळी मिळाले नाहीत, तर राज्य चालवायचे कसे ? तसेच राज्यासाठी केंद्राच्या ज्या योजना असतात, त्या योजनांचे पैसेही अद्याप आलेले नाहीत. केंद्र सरकार पक्षपातीपणा करीत राज्याला या योजनांचे पैसेच वेळेत देणार नसेल, तर या योजना राबवायच्या कशा ?
केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून नेहमीच महाराष्ट्राची आर्थिक गळचेपी करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारने केला आहे. केंद्र सरकारचे थोडेही आर्थिक पाठबळ नसतानाही महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्र चालवायचा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले असे खोटे, बिनबुडाचे आरोप महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.