ज्ञान,अनुभवाच्या जोरावर नारीशक्ती तेजोमय-सुषमा चोरडिया


पुणे : “महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्वच घटक प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याची मुहूर्तमेढ रोवली, ती जिजाऊ, सावित्रीमाई यांच्यासारख्या महान विभूतींनी. त्यांच्या आदर्शावर वाटचाल करत असलेल्या समाजात नारीशक्ती ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावर तेजोमय होत आहे. सर्वच क्षेत्रात या महिला आपली कर्तबगारी सिद्ध करत आहेत,” असे मत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सूर्यदत्ता संस्थेत ‘वुमेन्स मंथ’ साजरा होत आहे. रोजचा दिवस तिच्या आत्मसन्मानाचा असावा, हे बिंबवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून, तसेच या नारीशक्तीला मानवंदना म्हणून सर्व महिला कर्मचाऱ्यांना मानाचा फेटा बांधून सूर्यदत्तामध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजनही यावेळी करण्यात आले. ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, डॉ. विजयलक्ष्मी, डॉ. अरुणा सत्तार, डॉ. मेधा देशमुख, डॉ. धनंजय अवसारीकर, डॉ. सुनिल धनगर यांनी मनोगत व्यक्त केले. जागतिक महिला दिनी अफगाणिस्तानची विद्यार्थिनी समीरा आदिनाही उपस्थित होती.

अधिक वाचा  'सेवा तरंग' परिषदेत उलगडला सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे आणि बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या कार्याचा प्रवास

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “आजच्या आधुनिक युगात कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ नसून ते समान पातळीवर कार्यरत आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते, असे आधी म्हटले जात होते. मात्र, आज एकविसाव्या शतकात प्रत्येक स्त्रीला पुरुषही खंबीरपणे साथ देत आहे. हा समाजातील मोठा सकारात्मक बदल आहे.” करिअरमध्ये प्रगती साधण्यात त्याचा महिलांना फायदा होईल, असेही डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.

काव्यवाचन, संगीतखुर्ची स्पर्धां झाल्या. विजेत्या स्पर्धकांना डॉ. संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. १ मार्च ते ३१ मार्च हा ‘इंटरनॅशनल वूमन मंथ’ म्हणून साजरा करण्यात येणार असून, ३१ विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या अंतर्गत नियमितपणे गडकिल्ले दर्शन, सहलींचे आयोजन, महिलांवर आधारित चित्रपटांचे प्रसारण, आरोग्य, सक्षमीकरण, स्वच्छता, कौशल्य विकास अशा विविध विषयांवर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सूत्रसंचालन प्रा. सायली देशपांडे यांनी केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love