पुणे(प्रतिनिधी)– उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण ज्या पद्धतीने मांडायला हवे होते, ते मांडले नाही. उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यामुळे ते आंदोलकांना कशाला भेटतील, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ठाकरेंवर हल्लाबोल केला. कोणत्या पक्षाचे, कोणत्या घटकाचे याचा विचार न करता उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांना तत्काळ भेटायला हवे होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पुण्यात ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, भाजपाला आंदोलक पाठविण्याची गरज पडत नाही. सुप्रीम कोर्टात अंतिम केस सुरू असताना उद्धव ठाकरे सरकार झोपले होते. दोन चांगले वकील लावले असते, चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडले असते, तर आरक्षण गेले नसते. जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत, ते लोकांना का भेटतील? त्यांना आंदोलकांना भेटायला नाक राहिलेले नाही. उद्धव ठाकरे कधीही मराठा आरक्षणाच्या बाजूने नव्हते व राहणारही नाहीत. त्यांना काही देणे-घेणे नाही. उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांची अवहेलना केली आहे.
सावरकरांच्या मुद्दय़ावर बोलताना ते म्हणाले, सावरकरांचा मुद्दा घेऊन भाजपा निवडणूक लढेल, हा का विचार करता? सावरकर हा आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही. डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला कसा न्याय देऊ शकते, हे आम्ही लोकांना सांगणार आहोत. इंडिया आघाडीचा खोटारडेपणा आम्ही उघडा पाडणार आहोत. आमच्या जवळ कामाची शिदोरी आहे. तर त्यांच्याजवळ फेक नॅरेटिव्ह तयार आहे. आम्ही योजना आणि विकासाच्या माध्यमातून मते मागू. महाविकास आघाडीला मत म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचे नुकसान करणे आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
अमित शहा यांना अजितदादा वेशांतर करून भेटायचे हे योग्य पद्धतीने आणि मनमोकळेपणाने सांगितले आहे. जीवनातील घडामोडी सांगितल्या, त्यावरून राजकारण करायची काय गरज? सकाळी 9 वाजता झोपेतून उठून नौटंकी करणारे करणारेही आहेत, असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला.
राज साहेबांनी मोदीजी पंतप्रधान व्हावेत, याला पाठिंबा दिला होता. पण पुढच्या निवडणुकीला समर्थन नाही, हेही त्यांनी सांगितले होते. आता राज साहेबांनी निर्णय केला आहे. पण, राजकारणात उद्या काय होईल हे माहिती नाही, असे सांगतानाच अश्विनी वैष्णव 18 तास काम करतात, अपघातस्थळी तत्काळ पोहोचतात. त्यांच्या कर्तृत्वावर बोलणाऱयांनी स्वतःची उंची तपासावी, अशा शब्दात बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. मोठय़ा योजनांच्या जाहिराती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केल्या जातात, असे सांगत राज्य सरकारच्या जाहिरातबाजीचेही त्यांनी समर्थन केले.