पुणे- शक्ती कायद्यावर इतकी चमकोगिरी करण्यात आली. त्याच्या अंमलबजावणीचं काय झालं? यावर गृहमंत्री काही बोलतील का? राज्याचे गृहमंत्री पुण्यात येतात, कंट्रोलरूममध्ये जाऊन सोशल मीडिया पोस्टसाठी स्टंट करतात पण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या सरकारच्या प्राधान्यक्रमात दिसत नाही अशी टीका पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली .
विमाननगर परिसरातील एका पाच वर्षांच्या मुलीवर रविवारी दुपारी एका सुरक्षारक्षक कर्मचार्याने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने केली. या आंदोलनानंतर श्री. मुळीक पत्रकारांशी बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सरचिटणीस गणेश घोष, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्यासह पदाधिकारी, कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, पुणे शहरात दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलीवर बलात्कार होतो ही घटना अतिशय गंभीर असून, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सरकारच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे द्योतक आहे. ‘गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचेही मुळीक यांनी नमूद केले.
‘केवळ सत्तेच्या हव्यासापोटी जनमताचा अनादर करीत स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारला जनतेचे प्रश्न सोडविण्यात अजिबात स्वारस्य नाही. केवळ भ्रष्टाचार आणि बदल्यांमधील गैरव्यवहार हा त्यांचा एककलमी कार्यक्रम झाला आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठे जनआंदोलन केले जाईल., असा इशारा मुळीक यांनी यावेळी दिला.